TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावे, ही महाराष्ट्राची भावना’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

‘फुले दाम्पत्याच्या महान कार्याचा सन्मान व्हावा’; विधानसभेची केंद्राकडे एकमताने शिफारस

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, ही महाराष्ट्राची भावना आहे, असे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले. फुले दाम्पत्याच्या महान कार्याचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी महाराष्ट्र विधानसभेने केंद्र सरकारकडे एकमताने शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘ज्ञानाई ज्ञानशिल्प’ भित्तीचित्रांचे लोकार्पण सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.

महिला आज विज्ञान, प्रशासन, संरक्षण, शेती आणि अंतराळ अशा विविध क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या प्रगतीच्या मुळाशी सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आणि त्यांनी पेटवलेली ज्ञानज्योत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘ज्योती-सावित्री’ अभ्यास शाळा उभारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  उपवासाने वजन कमी होते, आरोग्य सुधारते? जाणून घ्या उपवासाचे फायदे आणि वैज्ञानिक दावे

‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ हा केवळ इतिहास नसून महाराष्ट्राचा आत्मा आणि वर्तमानाचा पाया आहे. हा वारसा जपण्याचे काम अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत केले. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यात फुले दाम्पत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून विशेष निधी दिल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ तसेच महिलांसाठी मोफत उच्च शिक्षणाच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख देणारे ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी सक्षमीकरण धोरण’ हा क्रांतिकारी निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यापीठात उभारण्यात आलेली ‘ज्ञानाई ज्ञानशिल्प’ ही केवळ कलाकृती नसून शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी शिल्पे आहेत. ही शिल्पे विद्यार्थी आणि नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार असल्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.

मराठवाड्यातील एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी आज राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री होऊ शकली, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेल्या ज्ञानज्योतीला जाते, अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी आठ वर्षे लागली. त्यासाठी २४ परवानग्या आवश्यक होत्या. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी या परवानग्या अवघ्या ३० मिनिटांत मिळवून दिल्याची माहिती राजेश पांडे यांनी दिली. स्मारकासाठी छगन भुजबळ यांनीही पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button