४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या ‘कॉम्बिनेशन’ औषधांवर केंद्राचे निर्बंध
क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइडयुक्त औषधांवर स्पष्ट इशारा बंधनकारक; मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी आणि खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. क्लोरफेनिरामाइन मॅलेट (Chlorpheniramine Maleate) आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड (Phenylephrine Hydrochloride) या घटकांचे निश्चित मात्रेतील मिश्रण असलेल्या औषधांच्या वापराबाबत ४ वर्षांखालील मुलांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषध मिश्रणांच्या वापरामुळे चार वर्षांखालील मुलांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारच्या नव्या आदेशानुसार, क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या औषधांवर ‘हे औषध चार वर्षांखालील मुलांसाठी वापरू नये’ असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा – सलमान खानच्या जिमला अचानक आग; दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात खळबळ
हा इशारा औषधाच्या लेबलवर, पॅकेज इन्सर्टवर तसेच प्रचारात्मक साहित्यावर ठळकपणे नमूद करावा लागणार आहे. औषध कंपन्यांना याबाबत आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी १५ एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने या दोन घटकांचा समावेश असलेल्या काही विशिष्ट ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधांवर वयोमर्यादेसंदर्भातील इशारा लागू केला होता. आता या निर्णयाची व्याप्ती वाढवून या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्व संबंधित फॉर्म्युलेशन्सचा समावेश करण्यात आला आहे.
लहान मुलांमध्ये सर्दी किंवा खोकल्याची लक्षणे दिसल्यास पालकांनी स्वतःहून औषधे देण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत, असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगितले जाते.





