TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले

‘काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला नेहमी चुकीच्या चौकटीत बसवतात’; सुप्रिया सुळेंचा टोला, चव्हाणांनी पवारांना INDIA आघाडीतच राहण्याचे केले आवाहन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार हे एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वाढलेल्या भेटीगाठी तसेच काही मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात घेतली जाणारी मवाळ भूमिका यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी एनडीएसोबत न जाता इंडिया आघाडीसोबतच राहावे, असे आवाहन केले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीए प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात असल्याचे म्हटले. शरद पवार हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे नेते असून त्यांनी मनुस्मृतीची विचारसरणी मानणाऱ्या लोकांसोबत जाऊ नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

चव्हाणांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच चुकीच्या चौकटीत बसवतात, असा टोला लगावला. केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा योग्य समन्वय नसल्यामुळे कदाचित अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असावीत, असेही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा –  दूध भेसळीविरोधात FDAची राज्यभर धडक कारवाई; २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ आणि २०२ लिटर दूध जप्त

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना आपण शरद पवारांविषयीच भाष्य केले असल्याचे स्पष्ट केले. तसेच आगामी काळात केंद्रातील सत्तेत बदल होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष असल्याचे सांगत येत्या काळात देशात सत्तांतर होईल, असे चव्हाण म्हणाले. हे सत्तांतर काँग्रेसमुळे होईल की अन्य कोणत्या राजकीय पक्षामुळे, हे आताच सांगणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, २०२९ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावा करत अमित शाह यांना आतापासून उपपंतप्रधान म्हणून घोषित करण्याची मागणी केली जात असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले.

शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चेपासून फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीपर्यंत आणि केंद्रातील संभाव्य सत्तांतरापर्यंतच्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button