निगडी-चाकण मेट्रोसाठी भोसरीचा राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडणार; NHAI उभारणार आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर
47.295 किमीच्या मेट्रो मार्गावर 34 स्थानके; 12,937 कोटींचा सुधारित डीपीआर, भोसरीचा पूल पाडण्यास महापौर रवि लांडगे यांचा विरोध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो विस्ताराला वेग येणार असून, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा 47.295 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गासाठी महामेट्रोने 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपयांचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेकडे सादर केला आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक फाटा ते खेडदरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याने भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
सध्या पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू असून, पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गाचे काम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यानंतर निगडी ते चाकण मेट्रो मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा उर्वरित भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड आणि चाकण एमआयडीसी यांच्यात मेट्रोद्वारे थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सर्वसाधारण सभेत सुधारित डीपीआरचे सादरीकरण केले. या मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २८, तर चाकण नगरपालिका हद्दीत सहा, अशी एकूण ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा ३३० कोटी रुपये राहणार आहे.
भोसरीचा पूल पाडण्यास महापौरांचा विरोध
नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारने ७ हजार ८२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून, त्याच कामाचा भाग म्हणून भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उड्डाणपूल पाडण्यास महापौर रवि लांडगे यांनी विरोध दर्शविला आहे. पूल कायम ठेवून पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पूल पाडला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सुधारित डीपीआरचे नगरसेवकांसमोर पुन्हा सादरीकरण करून उपसूचनेनुसार आवश्यक बदल करण्यात येतील, असा दावा महापौर लांडगे यांनी केला.
निगडी ते चाकण असा मेट्रोचा विस्तार
प्रस्तावित मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्तीपासून ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक, वाकड, विशालनगर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, भोसरी, मोशी, चिंबळी फाटा, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडीमार्गे चाकणपर्यंत जाणार आहे.
वाकड येथे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाशी जोडणी होणार असल्याने प्रवाशांना मेट्रो बदलण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह हिंजवडी आणि चाकण औद्योगिक परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण अंतर : 47.295 किमी
एकूण स्थानके : 34
पिंपरी-चिंचवडमधील स्थानके : 28
चाकणमधील स्थानके : 6
मार्ग : उन्नत (एलिव्हेटेड)
एकूण खर्च : ₹12,937.23 कोटी
महापालिकेचा हिस्सा : ₹330 कोटी
केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा : प्रत्येकी ₹1,721.71 कोटी





