अमेरिका-इराण संघर्ष पेटणार? ट्रम्प यांचा होर्मुझवर दावा, तर इराणकडून ‘विध्वंसक’ प्रत्युत्तराची तयारी

Strait of Hormuz | अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा करत इराणला कडक इशारा दिला आहे. याउलट, अमेरिकेकडून कोणत्याही नव्या धमक्या आल्यास त्याला ‘विध्वंसक आणि विनाशकारी’ प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणच्या सशस्त्र दलांनी दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणबरोबर सध्यातरी कोणत्याही करारासाठी ते तयार नाहीत. होर्मुझ सामुद्रधुनीला सध्या आपण अमेरिकेचाच प्रदेश मानतो आणि त्यावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र मिळवू देणार नाही आणि इराणने योग्य भूमिका न घेतल्यास पुढील कठोर पावले उचलली जातील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणविरोधात इतिहासातील सर्वात कठोर आर्थिक निर्बंध लागू केले जातील आणि इराणला आर्थिक मदत करणाऱ्या इतर देशांवरही कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा
‘आरक्षण गरिबांसाठी असावे’; दिल्लीतील जंतरमंतरवर जातीय आरक्षणाविरोधात आंदोलन
इराणकडून ‘विध्वंसक’ प्रत्युत्तराचा इशारा
अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल अली अब्दुल्लाही यांनी सांगितले की जमीन, समुद्र, हवाई क्षेत्र, हवाई संरक्षण आणि सायबर अशा सर्वच आघाड्यांवर अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराणी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. तसेच अमेरिकेकडून कोणतीही नवी आगळीक किंवा धमक्या आल्यास त्याला अत्यंत कठोर, शिक्षा देणारे आणि विनाशकारी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणी माध्यमांनी दिला आहे.
जागतिक तेलवाहतुकीवर संकटाचे सावट
दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे आणि पारंपरिक लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले असले, तरीही देशाकडे प्रगत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तंत्रज्ञान कायम आहे. यामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून होणाऱ्या जागतिक तेल टँकर्सच्या वाहतुकीला आणि परिसरातील आंतरराष्ट्रीय लक्ष्यांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





