बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप: भारतीय महिला दुहेरी जोडी उपांत्य फेरीत!

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने महिला दुहेरी प्रकारात सेमीफायनलमध्ये आगेकूच केली. या वाटचालीसह या दोघीचं पदक पक्कं झालं आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने २०११ मध्ये या स्पर्धेत पदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर या स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात सेमीफायनलपर्यंत धडक मारणारी ही दुसरीच जोडी आहे.
६९ मिनिटं चाललेल्या चुरशीच्या क्वार्टरफायनलच्या मुकाबल्यात ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने जिआ यी फान आणि झांग शू शिआन जोडीवर १६-२१, २१-१५, २१-१३ असा विजय मिळवला. गायत्री ही भारताचे महान बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या आहे. ट्रीसा आणि गायत्री जोडीला पहिल्या गेममध्ये लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये झालेल्या चुकातून बोध घेत या जोडीने दुसरा आणि तिसरा गेम जिंकत बाजी मारली.
हेही वाचा
🏸🇮🇳 भारतीय महिला दुहेरी जोडी उपांत्य फेरीत!
भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरी जोडीचा उपांत्य फेरीत चीनच्या अव्वल मानांकित लियू शेंग शू आणि टॅन निंग यांच्याशी सामना होणार.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये हा महत्त्वाचा सामना रंगणार असून,… pic.twitter.com/rdEApIxeEL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 22, 2026
या जोडीने २०२२ आणि २०२३ मध्ये प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत वाटचाल केली होती. २०२२ कॉमनवेल्थ स्पर्धेत या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या वर्षीच या जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल १०मध्ये स्थान पटकावलं होतं.
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या आधी सरावादरम्यान ट्रीसाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे जोडीची वाटचाल विस्कळीत झाली. दरम्यान या स्पर्धेत एकेरी प्रकारात भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पी.व्ही.सिंधूसह लक्ष्य सेन, आयुष शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.





