सलमान खानच्या जिमला अचानक आग; दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात खळबळ
पोलिसांकडून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले, शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जिमला गुरुवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू ग्रेटर कैलास-1 परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा दहाच्या सुमारास जिमच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच जिममधील सर्व व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा – निगडी-चाकण मेट्रोसाठी भोसरीचा राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडणार; NHAI उभारणार आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
घटनेनंतर प्रभावित परिसर सील करण्यात आला असून फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांकडून घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जिम सलमान खानच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खान हा बॉलिवूडमधील प्रमुख फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्याशी संबंधित जिमला आग लागल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
सुदैवाने वेळीच केलेल्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समोर आले आहे.





