बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : RCBचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक

Bengaluru Stampede | बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजयाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दु:खद घटनेत 11 जणांचा मृत्यू आणि 75 जण जखमी झाले. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी मोठी कारवाई करत RCB चे मार्केटिंग आणि रेव्हेन्यू हेड निखिल सोसाले यांना अटक केली आहे. त्यांच्यासह डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांना, किरण कुमार (सीनियर इव्हेंट मॅनेजर), सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांनाही कब्बन पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
निखिल सोसाले यांना गुरुवारी रात्री (5 जून) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विमानात बसण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आले. असे सांगितले जाते की, त्यांनी विजय परेडची घोषणा पोलिस परवानगीशिवाय केली होती आणि पोलिसांनी नकार दिल्यानंतरही सोशल मीडियावरील पोस्ट काढली नाही, ज्यामुळे गोंधळ वाढला.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक क्रिकेट बोर्ड प्रशासकीय समिती आणि RCB यांच्यावर फौजदारी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, तर सीमंत कुमार सिंग यांनी नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते, आणि त्यानुसार ही अटक झाली आहे. या घटनेमुळे RCB च्या विजयाच्या आनंदावर विरजण पडले असून, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष अद्याप फरार असल्याची माहिती आहे.