गोविंदाला गोळी लागण्याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया
प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर
मुंबई : बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा मंगळवारी पहाटे जखमी झाला. गोविंदाच्या डाव्या पायाला बंदुकीची गोळी लागली. मुंबईतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात गोविंदावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विविध सेलिब्रिटींनी रुग्णालयात गोविंदाची भेट घेतली. दिग्दर्शक डेविड धवन, भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह यांनी रुग्णालयात जाऊन गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा, निर्माता जॅकी भगनानी, कॉमेडियन सुरेश लहरी यांनीसुद्धा गोविंदाची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली.
त्याची प्रकृती आता स्थिर आहे. तो ठीक आहे. हा एक अपघात होता. अपघातात जर तरच्या गोष्टी नसतात. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. ही प्रतिक्रिया देत त्यांनी या घटनेत घातपाताची किंवा कट कारस्थानची शक्यता नाकारली आहे. गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागलीच कशी, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला होता. ही गोळी चुकून लागली की यामागे काही वेगळं कारण आहे, असेही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते.
गोविंदाच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली असून याप्रकरणी त्यांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. गोविंदा कोलकात्यासाठी घरातून निघत होता, तेव्हा ही घटना घडली. यावेळी घरात त्याची पत्नी सुनितासुद्धा उपस्थित नव्हती. सुनिताने सांगितलं, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे. मी सध्या मुंबईबाहेर आहे. याबद्दलची माहिती मिळताच मी इथून निघाले आहे. इथून थेट मी रुग्णालयात जाणार आहे.
गोविंदाला गोळी कशी लागली?
मंगळवारी गोविंदा सकाळी 7 वाजताच्या सुमारास विमानाने कोलकात्याला जाणार होता. घरातून निघत असताना तो बंदूक कपाटात ठेवत होता. त्यावेळी हातातून बंदूक खाली पडली आणि बंदुकीतून एक गोळी सुटली. ती गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गोळी बाहेर काढली असून गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे.