अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई | राज्यातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांच्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात परिवहन आयुक्तांनी देखील सायबर विभागाला स्वतंत्र पत्र पाठवून कारवाईची विनंती केली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही वैध परवानगीशिवाय किंवा शासन मान्यतेशिवाय विविध ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या कंपन्यांच्या बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या अनधिकृत सेवांमध्ये चालकांची पडताळणी, विमा संरक्षण आणि महिलांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप मंत्र्यांनी केला आहे.
हेही वाचा
अक्षर पटेलला मोठा फटका; पंजाबला हरवल्यानंतर बीसीसीआयकडून दंडात्मक कारवाई
परिवहन नियमांचे खुलेआम उल्लंघन करून सुरू असलेल्या या ॲप्समुळे अधिकृत परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर मोठा अन्याय होत असल्याचेही परिवहन विभागाने म्हटले आहे. या ॲप्समार्फत होणारे आर्थिक व्यवहार हे नियमबाह्य असून, त्यामुळे कायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या घटकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
सायबर क्राईम विभागाकडे पाठवलेल्या या पत्रात प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सचे ऑनलाईन संचालन त्वरित बंद करणे, संबंधित कंपन्या, त्यांचे चालक आणि व्यवस्थापनाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करणे आणि कंपनी मालकांवर थेट गुन्हे दाखल करणे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राज्यातील बेकायदेशीर वाहतूक यंत्रणेला मोठा चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





