‘तुम्ही आम्हाला फसवलं तर तुम्हालाही डुबवणार’; मनोज जरांगेचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांना आज गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर ते बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे होणाऱ्या एका धार्मिक सप्ताहास भेट देणार आहेत. यावेळी जरांगे पाटील यांना प्रवास करताना त्रास होत असल्याचे जाणवले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंतरवली सराटीमध्ये आमचं आंदोलन सुरु आहे. मी रुग्णालयातून चाकरवाडीला जाणार आहे आणि पुन्हा रुग्णालयात येणार आहे. मला इथून कुणीही जायला सांगितलेलं नाही. तसंच मी अशा गोष्टी ऐकतही नसतो. लक्ष्मण हाकेंचं बेमुदत उपोषण सुरु आहे. हाके आंदोलन करत आहेत म्हटल्यावर सरकारी शिष्टमंडळ येणारच. आंदोलन केलं म्हटल्यावर यावंच लागणार. मात्र दोघांचीही सारखीच फजिती होणार आहे लक्षात ठेवा. सरकारने १५ ते २० वर्षे आम्हाला फसवलं आहे. आजपर्यंत आम्हाला पाणी पाजत होते, आता तु्म्हाला पाणी पाजतील.
हेही वाचा – ‘मोदींनी सभा घेतलेल्या १० ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले’; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
आणखी चार महिन्यांनी काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार, १०० टक्के घरी पाठवणार. आम्ही आता रडत बसणार नाही, असं म्हणत त्यांनी सरकारलाही इशारा दिला. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मुख्य मागणी आहे. आम्ही आता आंदोलन करणार नाही येत्या निवडणुकीत २८८ उभे करु किंवा २८८ जणांना पाडू, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमचं हक्काचे आरक्षण मागतो आहे ते आम्हाला द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवलं जातं आहे. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे. आरक्षण ओबीसीतून घेणार अन्यथा २८८ उभे करू नाहीतर २८८ जणांना पाडू. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे, असं जरांगे म्हणाले.
आम्ही दोन टप्प्यात पाहणी, चाचणी केलेली आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात आम्ही चाचणी केली हे खरे आहे. सरकार असेच करत राहिले तर २८८ उभे करायचे की पाडायचे,याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ विधानसभा आणि दुसऱ्या टप्प्यात ४३ विधानसभा अशी चाचणी झाल्याचे ते म्हणाले. कोणी जर आम्हाला फसवल त्यांना आम्ही कायमचे घरी पाठवू असा इशारा त्यांनी दिला.





