BJP PCMC: ‘एसआयआर’ अन् संघटनात्मक कामगिरी ठरणार निर्णायक!
प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्यांसाठी भाजपाचे ‘‘निकष’’ : भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग समित्यांवरील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी भारतीय जनता पक्षाने स्पष्ट निकष जाहीर केले असून, ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेतील कामगिरी आणि पक्षासाठी केलेले संघटनात्मक योगदान हेच निर्णायक ठरणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांवर एकूण ३० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती दि. २७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत होण्याची शक्यता असून, त्यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
यासंदर्भात शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी दि. १८ जुलै २०२६ रोजी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात लिखित अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, प्रभाग क्रमांक, पक्षातील कार्याचा कालावधी, शैक्षणिक पात्रता, संपूर्ण रहिवासी पत्ता आदी माहिती नमूद करणे बंधनकारक राहणार आहे.
विशेष म्हणजे, इच्छुक कार्यकर्त्यांनी दि. २५ जुलै २०२६ पर्यंत आपल्या प्रभागातील किमान १५ बूथवर ८० टक्क्यांपेक्षा अधिक SIR मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. तसेच, संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा सरचिटणीसांकडून ‘Task Letter Completion’ प्राप्त करून ते विहित मुदतीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल.
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, भोसरीसाठी विकास डोळस आणि पिंपरीसाठी वैशाली खाडये यांच्याकडून जारी केलेले ‘Task Letter Completion’च ग्राह्य धरण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या संघटनात्मक विस्तारासाठी कार्यरत असलेल्या पदाधिकारी, बूथप्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांना आगामी काळात मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने, शहरातील राजकीय वर्तुळात या नियुक्त्यांबाबत उत्सुकता वाढली आहे.
याबाबत शत्रुघ्न काटे म्हणाले की, “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि संघटन मजबूत करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेतली जाते. निर्धारित मुदतीत SIR मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून संबंधित सरचिटणीसांचे ‘ऑफिशियल टास्क कन्फर्मेशन लेटर’ सादर करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांच्याच नावाची शिफारस मी, शहराध्यक्ष या नात्याने, भाजपच्या कोअर कमिटीकडे प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य म्हणून करणार आहे.” निर्धारित निकषांनुसार SIR मोहीम पूर्ण न करणाऱ्या किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारस करण्यात येणार नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथस्तरावरील मजबुतीकरण, मतदार यादी पुनरीक्षण आणि नवमतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या या केवळ राजकीय समतोलासाठी नव्हे, तर आगामी निवडणुकांसाठी सक्षम संघटन उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
अतिवृष्टीमुळे SIR मोहिमेला मुदतवाढ
अतिवृष्टीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, गृहभेटींची प्रक्रिया आता दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. मतदार यादीचे प्रारूप दि. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, दावा-हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा असेल. दावा-हरकतींची छाननी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, अंतिम मतदार यादी दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने बूथस्तरावरील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
“देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मतदारांना SIR प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे कार्यकर्ते बूथस्तरावर सक्रियपणे काम करत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य नियुक्त्यांमध्ये निश्चितच प्राधान्य देण्यात येईल. भाजपामध्ये मेहनत, पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क यांनाच खरे महत्त्व आहे.”
— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





