पुण्यात रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास बंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश

पुणे | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाके विक्री व वाजविण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटम बॉम्ब’ फटाके बाळगणे, विक्री करणे आणि वाजविणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा : येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसर १०० मीटर अंतरापर्यंत ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, या भागात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा फटाके वाजविण्यास बंदी आहे.
फटाके विक्रेत्यांना देखील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, २० ते २४ ऑक्टोबर दरम्यानच तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महामार्ग, पूल किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे व अग्निबाण उडविणे यावरही बंदी आहे.
फटाक्यांचा आवाज १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावा, अशी अट घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.





