चऱ्होलीतील ‘बेसिल सेरिनिटी’मध्ये अनधिकृत बांधकाम? ; फ्लॅटधारकांचा ‘बेसिल डेव्हलपर्स’वर आरोप!
‘बेसिल डेव्हलपर्स’ला नोटीस; समाधानकारक उत्तर न मिळाल्यास न्यायालयीन लढाईची तयारी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : चऱ्होली बुद्रुक येथील ‘बेसिल सेरिनिटी’ या गृहनिर्माण प्रकल्पात मंजूर आराखड्याच्या विरोधात अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, संतप्त फ्लॅटधारकांनी थेट ‘बेसिल डेव्हलपर्स’ यांना नोटीस बजावत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्यास महापालिका, महारेरा आणि न्यायालयीन स्तरावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
फ्लॅटधारकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, ‘बेसिल सेरिनिटी’ प्रकल्पातील इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अतिरिक्त आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या बांधकामासाठी आवश्यक असलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची परवानगी, महारेराकडे सादर करण्यात आलेले सुधारित मंजूर आराखडे आणि इतर वैधानिक कागदपत्रे अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित इमारत अद्याप विकासकाच्या देखभाल मुदतीत (मेंटेनन्स पिरियड) असताना हे बांधकाम करण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
फ्लॅटधारकांनी ‘बेसिल डेव्हलपर्स’कडे पुढील मागण्या केल्या आहेत :
1. अतिरिक्त बांधकामासंदर्भातील सर्व मंजुरी व सुधारित आराखडे तात्काळ सादर करावेत.
2. वैध परवानग्या नसल्यास संबंधित बांधकाम त्वरित थांबवावे.
3. मंजूर आराखड्याच्या विरोधात बांधकाम झाल्याचे निष्पन्न झाल्यास ते हटवून मूळ स्थिती पूर्ववत करावी.
4. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण द्यावे.
नोटीसवर अनेक फ्लॅटधारकांच्या स्वाक्षऱ्या असून, विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC), महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MahaRERA) तसेच अन्य सक्षम प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘महाईन्यूज’चे सोसायटीधारकांना आवाहन…
घर खरेदी ही सामान्य नागरिकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. त्यामुळे कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पात मंजूर आराखड्याच्या बाहेर बांधकाम होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जातो. ‘महाईन्यूज’ची भूमिका स्पष्ट आहे—रहिवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर पारदर्शकता आणि कायद्याचे पालन झाले पाहिजे.
तथापि, या प्रकरणात ‘बेसिल डेव्हलपर्स’ यांची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असून, त्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही तितक्याच प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.






