एचएसआरपी सप्टेंबरपर्यंत ‘बूक’; सक्षम यंत्रणेची नागरिकांकडून मागणी

नागपूर : राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची मोहीम शासनाने हाती घेतली. नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची प्रशासनाकडून एकीकडे ओरड होत आहे, मात्र केंद्रच अपुरे असल्याने नागरिकांना नोंदणी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. आता नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यास 7 सप्टेंबरपर्यंत बुकिंग फुल्ल झाले असल्याचा संदेश झळकतो. त्यामुळे यंत्रणाही आता सक्षम करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती, जी आता ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला. मात्र नंबरप्लेट बसविण्यासाठीच्या अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नंबर प्लेट बसवून घेणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे.
हेही वाचा – अजित पवारांकडून नुकसानीची पाहणी
मुदत संपायला आता केवळ ३५ दिवस बाकी आहेत, या अल्पावधीत २१ लाख २३ हजार वाहनांना नंबर प्लेट कशी लावणार? नागरिकांचाही अल्प प्रतिसाद असून प्रशासनानेही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन आरटीओ कार्यालयांतर्गत २२ लाख ३४ हजार वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्याची गरज आहे. मात्र आतापर्यंत केवळ १ लाख ८ हजार १२ वाहनांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली. केवळ ४.८४ टक्केच नंबर प्लेट बसवून झाल्या आहेत.
महाराष्ट्रात रोस्मार्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड, रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रा. लिमिटेड या तीन कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले आहे. महाराष्ट्रात कुठल्याही केंद्रांवर यासाठी नोंदणी करता येते, असा दावा परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असला तरी यात अनेक त्रुट्या आहेत. नागपूरची गाडी पुण्यात नोंदणी करता येते, मात्र चंद्रपूरची गाडी नागपुरात नोंदणी करताना नागपूर ग्रामीणमधील केवळ एकच केंद्रच दिसते. याही केंद्रावर 7 सप्टेंबरपर्यंत कुठलीही तारीख उपलब्ध नाही.