भारताची विजयी सलामी: पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव!

प्रत्येक मोठ्या स्पर्धेतील पहिला सामना हा संघासाठी एक परीक्षा असतो. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून आपली तयारी दाखवून दिली. हा सामना जरी तसा सरळसरळ वाटला तरी एका टप्प्यावर बांगलादेशने भारताला चांगलेच आव्हान दिले. चला, या सामन्याचा थोडक्यात आढावा घेऊया.
बांगलादेशची ढासळती सुरुवात, ऋदयचा लढाऊ खेळ
दुबईच्या गुळगुळीत खेळपट्टीवर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांच्या सलामीवीरांनी तो निर्णय चुकीचा ठरवला! भारताच्या मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीच्या षटकांमध्येच बांगलादेशी फलंदाजांना परत पाठवले. एका क्षणी त्यांची अवस्था 35/5 अशी झाली होती.
मात्र, ऋदय आणि अली यांनी लढत देत 154 धावांची भागीदारी रचली. ऋदयने शानदार शतक ठोकत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. अखेर बांगलादेशने 229 धावांचे आव्हान दिले. मोहम्मद शमीने पाच बळी घेत दमदार पुनरागमन केले.
भारतीय फलंदाजांची सहज विजयी खेळी
229 धावांचे लक्ष्य मोठे नव्हते, पण कोणताही सामना हलक्यात घेता येत नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने आक्रमक सुरुवात करत पहिल्याच दहा षटकांत सामना एकतर्फी केला. रोहित 41 धावांवर बाद झाला, त्यानंतर कोहलीही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही.
हेही वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांचा कारावास, मंत्रीपद धोक्यात?
पण, शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. राहुलने 47 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
पुढील सामना: महायुद्ध पाकिस्तानविरुद्ध!
भारताने पहिला सामना सहज जिंकला असला, तरी खरी कसोटी 23 तारखेला पाकिस्तानविरुद्ध आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा थरार!
भारताने हा सामना जिंकून मोठा आत्मविश्वास कमावला आहे. गोलंदाजीत शमीचा फॉर्म आणि फलंदाजीत शुभमन गिलचा ठामपणा हा संघासाठी चांगली गोष्ट आहे. पण, पाकिस्तानविरुद्ध खेळताना अजून सरस कामगिरी करावी लागेल.
भारताचे क्रिकेटप्रेमी या ऐतिहासिक सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पाहायचे की, भारतीय संघ आपली विजयी लय कायम ठेवतो का!
✍️ लेखक: हर्षल आल्पे