कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांचा कारावास, मंत्रीपद धोक्यात?

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. १९९५ साली कागदपत्रामध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणी कोर्टाने निकाल सुनावला आहे.
फसवणूक प्रकरणाची अंतिम सुनावणी कोर्टात आज सुरू होती. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने या खटल्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोषी ठरवले. माजी मंत्री तुकाराम दिघोंळेंनी कोकाटे बंधूंविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. या खटल्यावर अखेर कोर्टाने निकाल दिला आहे. आता कोर्टाने २ वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आलं आहे.
हेही वाचा : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू
नेमकं प्रकरण काय?
१९९५ ते १९९७ सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. १९९५ साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.