Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिकेत वाद पेटला! आंतरराष्ट्रीय जहाजांना इराणचा कडक इशारा, तर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला

Iran Hormuz Strait Warning issued | पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक समजल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. इराणने या जलमार्गावरील आपल्या सार्वभौमत्वाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करत व्यापारी आणि नौदलाच्या सर्व जहाजांना कडक इशारा दिला आहे. जहाजांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या विधानानुसार, ‘खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर’ने घोषित केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांद्वारे पूर्ण अधिकाराने केले जाते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्व व्यावसायिक जहाजांनी आणि टँकर्सनी केवळ इराणने निश्चित केलेल्या मार्गावरूनच प्रवास करावा. तसेच, ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नेव्ही’ची (IRGC) रीतसर परवानगी मिळवणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास जहाजांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होईल, अशी धमकी इराणने दिली आहे. सध्या इराण आणि ओमान दरम्यान या जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर कर आकारण्याबाबत आणि तो महसूल वाटून घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच इराणने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा

डी. के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! ३ जून रोजी होणार भव्य शपथविधी सोहळा

अमेरिकेकडून जहाजावर ‘हेलफायर’ क्षेपणास्त्राचा मारा

दुसरीकडे, ओमानच्या आखातात अमेरिकन लष्कराने एका व्यावसायिक जहाजावर थेट क्षेपणास्त्र हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, गॅम्बियाचा ध्वज असलेले ‘लियान स्टार’ नावाचे जहाज अमेरिकेची नाकेबंदी झुगारून इराणच्या बंदराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. या जहाजाला अमेरिकन विमानाने २० हून अधिक वेळा इशारे दिले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर जहाजाच्या इंजिन रूमवर ‘हेलफायर’ (Hellfire) क्षेपणास्त्र डागून ते जहाज निकामी करण्यात आले. या हल्ल्यानंतर जहाजाची इराणसमोरील कूच थांबली.

नाकेबंदी उठवण्याबाबत ट्रम्प आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये मतभेद?

या संपूर्ण घडामोडींदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली. युनायटेड स्टेट्स (अमेरिका) गेल्या महिन्यापासून इराणी बंदरांवर लादलेली नौदलाची नाकेबंदी (Naval Blockade) उठवेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. आपल्या ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अडकलेली जहाजे आता सुरक्षितपणे घरी परतू शकतात.” ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे तणाव कमी होण्याचे संकेत मिळत असतानाच, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मात्र वेगळा दावा केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकन नौदलाची कोंडी किंवा नाकेबंदी अजूनही पूर्णपणे लागू आहे, असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. यामुळे या भागात अजूनही युद्धाचे ढग गडद आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button