आरसीबी इतिहास रचणार की गुजरात बाजी मारणार? आयपीएल २०२६ च्या विजेतेपदासाठी आज रंगणार हायव्होल्टेज मुकाबला

IPL Final 2026 | इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२६) च्या १९ व्या हंगामाचा महाअंतिम सामना आज, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणारे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन बलाढ्य संघ जेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ सलग दुसऱ्यांदा ‘आयपीएल’ करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी मैदानात उतरेल, तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ घरच्या मैदानावर इतिहास रचण्यास उत्सुक आहे.
आरसीबी इतिहास रचणार की गुजरात बाजी मारणार?
आरसीबीने या संपूर्ण हंगामात आपल्या अत्यंत आक्रमक आणि स्फोटक खेळण्याच्या शैलीने वर्चस्व राखले आहे. ‘क्वालिफायर-१’ च्या लढतीत आरसीबीने याच आक्रमकतेच्या बळावर गुजरातला पराभूत करत थेट फायनल गाठली होती. आरसीबीने या हंगामात अनेकदा २०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या शांत आणि संतुलित नेतृत्वामुळे संघाला मोठी स्थिरता मिळाली असून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा आयपीएल जेतेपद पटकावणारा तिसरा संघ बनण्याचे आरसीबीचे लक्ष्य असेल.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सने अत्यंत धैर्याने आणि चिकाटीने खेळत गेल्या ५ वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या क्वालिफायरमधील पराभवानंतर गुजरातने जोरदार पुनरागमन केले आहे. अहमदाबादच्या घरच्या मैदानावर (Home Ground) खेळण्याचा आणि चाहत्यांच्या पाठिंब्याचा मोठा फायदा गुजरातला मिळू शकतो. गुजरातचा संघही आपले दुसरे आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.
हेही वाचा
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यात शुल्कात मोठी कपात
धावांचा पाऊस पडणार; फलंदाजांना पूरक खेळपट्टी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत असल्याने आजच्या महामुकाबल्यातही चौकार-षटकारांची आतषबाजी आणि मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. आकडेवारीचा विचार केला तर आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत ९ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, ज्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही.
दोन्ही संघांचे संभाव्य १२ खेळाडू:
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू:
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, वेंकटेश अय्यर, टीम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, रसिक दार, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स:
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा, प्रसिध कृष्णा.
सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण:
हा हायव्होल्टेज अंतिम सामना आज सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी या वाहिन्यांवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टार (JioHotstar) अॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.





