IPL 2026 Prize Money : आयपीएल जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार? जाणून घ्या..

IPL 2026 Prize Money | इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२६) चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात जेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने गुजरातला हरवून थेट फायनल गाठली होती, तर गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत पुनरागमन केले. आज दोन्ही संघांकडे इतिहास रचत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची सुवर्णसंधी आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदाच्या हंगामासाठी एकूण ४६.५ कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे.
आज जो संघ आयपीएल २०२६ च्या जेतेपदाचा मान मिळवेल, त्या विजेत्या संघाला बीसीसीआयकडून तब्बल २० कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रतिष्ठेची आयपीएल ट्रॉफी दिली जाईल. आरसीबी पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे, तर गुजरात टायटन्स घरच्या मैदानावर आपले दुसरे जेतेपद पटकावण्यासाठी पूर्ण जोर लावणार आहे.
हेही वाचा
उपविजेता संघही होणार मालामाल
अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार नाही. उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून १३ कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली जाणार आहे.
प्लेऑफमधील इतर संघांना किती मिळणार?
विजेत्या आणि उपविजेत्या संघांशिवाय प्लेऑफमध्ये पोहोचलेले इतर दोन संघही मालामाल होणार आहेत. क्वालिफायर २ मध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाला ७ कोटी रुपये दिले जातील. तर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला ६.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. प्लेऑफसाठी पात्र न ठरलेल्या उर्वरित संघांना कोणतीही रक्कम दिली जाणार नाही. याशिवाय हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या ‘ऑरेंज कॅप’ आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या ‘पर्पल कॅप’ विजेत्या खेळाडूंनाही विशेष रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.





