‘‘ॲक्शन प्लॅनला’’ ला अतिरिक्त आयुक्तांचा ‘‘बुस्टर’’
विविध विभागांना भेट : शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. या अनुषंगाने प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी गुरुवार (२० फेब्रुवारी) रोजी महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने
याप्रसंगी भांडार विभागाचे उप आयुक्त निलेश भदाणे, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखळे, स्थापत्य विभागाचे अभियंता बाळासाहेब शेटे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी दिपक पवार यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, महानगरपालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, महानगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, अशा विविध बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे.
विभाग स्तरावर काटेकोर नियोजन करा…
शंभर दिवसांच्या या कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभाग, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, करसंकलन व कर आकारणी विभाग येथे आतापर्यंत कशा पद्धतीने काम करण्यात आले आहे, याचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी थेट यासर्व विभागांना भेट दिली. तसेच कृती कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांचे जीवन सुखकर करण्यास प्राधान्य देणे आपल्या मुलभूत कर्तव्यांचा महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागात हा कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कृती कार्यक्रमांचा आढावा सातत्याने घेण्यात येत असून त्यासाठी प्रत्यक्ष विभागांना भेटी देण्यात येत आहेत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका