Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘गणोजी शिर्केंबाबत चुकीचा इतिहास दाखवला’; शिर्केंच्या वंशजांचा ‘छावा’ सिनेमावर आक्षेप

मुंबई | विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत भारतात २०० कोटींहून आणि जगभरात ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. याचदरम्यान राजेशिर्के कुटुंबाने ‘छावा’ सिनेमावर आक्षेप घेतला आहे. शिर्केंच्या वंशजांनी एक पत्रकार परिषद घेऊन शिर्केंना खलनायक दाखवलं, ते चुकीचं असून बदलण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

दीपकराजे शिर्के म्हणाले, की नुकताच ‘छावा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात खूप चुकीचा व मोडतोड करून इतिहास दाखवला आहे. इतिहासामध्ये बदल करून खूप चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात राजेशिर्केंची प्रत्यक्ष बदनामी केली आहे, कोणताही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसतानाही या कुठल्यातरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी या चित्रपटामध्ये आमच्या राजेशिर्कें कुटुंबाची बदनामी केली, त्याचा निषेध आम्ही करत आहोत.

आम्ही दिग्दर्शक उतेकरांना, छावाचे लेखक आता नाहीत पण प्रकाशकांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवू. आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही शिवजयंतीमुळे १९-२० तारखेपर्यंत थांबलो होतो. चांगल्या कामात आणि छत्रपतींचा उत्साह साजरा करण्यात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही शिवजयंतीनंतर पत्रकार परिषद घेतली, असं ते म्हणाले.

हेही वाचा  :  मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आमची एकच मागणी आहे ती म्हणजे चित्रपटातील आक्षेपार्ह व राजेशिर्के कुटुंबाची बदनामी करणाऱ्या बाबी लवकरात लवकर वगळण्यात याव्या आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात यावा. खूप सुंदर चित्रपट तयार केला आहे. चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात. जगापुढे खूप चांगला मेसेज जात आहे. छत्रपती संभाजीराजे जगाला कळत आहेत. परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवला आहे, हे मी उतेकरांना सांगू इच्छितो, असं दिपकराजे शिर्के म्हणाले.

मी उतेकरांना जाहीर आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटात बदल करून पुन्हा प्रदर्शित करावा, अन्यथा तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच राजेशिर्के परिवार व त्यांच्या आप्तेष्ट मंडळींच्या रोषाला सामोरं जावं लागेल. नाहीतर तुम्हाला अब्रूनुकसानीचा १०० कोटींचा दावा आम्ही करणार आहोत. आम्ही कायदेशीर नोटीस दिलेली आहे, राज्य शासनालाही नोटीस दिली आहे. आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की अशा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी होऊ नये, कुणालातरी बदनाम करण्याचा हेतूपूर्वक कट साध्य होऊ नये, असंही दिपकराजे शिर्के म्हणाले.

राजेशिर्के परिवारावर होणारा अन्याय थांबला पाहिजे. इतिहास दाखवू नका असं आम्ही म्हणत नाही, पण योग्य आणि खरा इतिहास दाखवा. मोडतोड करून, बदल करून समजात तेढ निर्माण होते, असं कुठेही दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. उतेकरांनी चित्रपटात लवकरात लवकर बदल करावा नाहीतर त्यांचं महाराष्ट्रात फिरणं बंद करू असा इशारा मी त्यांना देतोय. आम्ही चित्रपटावर बंदी घालण्यासाठी आलो नाही, चित्रपट खूप सुंदर आहे पण खलनायक चुकीचा दाखवला आहे. त्यांनी जबरदस्ती इतिहासात बदल करून चुकीचा खलनायक दाखवला आहे, हे आम्ही सहन करणार नाही. आमची बदनामी आम्ही सहन करणार नाही, असं दिपकराजे शिर्के म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button