23 जिल्ह्यांसाठी अलर्ट! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने काय सांगितलं?

Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, कोकणासह राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा
कोकण विभागात पावसाचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
हेही वाचा – स्क्रीन शेअरिंग ते बनावट लिंक्स; सायबर भामट्यांपासून सावध राहण्यासाठी ‘या’ सवयी ठरणार ढाल
शेतकऱ्यांमध्ये समाधान, पेरणी कामांना वेग
दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, राज्यभर मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पावसामुळे शेतीला मोठा दिलासा मिळण्यासोबतच धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





