संतापजनक! अंगणवाडीतील चिमुकलीला लाथ मारून बाहेर काढलं; व्हायरल VIDEO वर आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

Anganwadi girl kicked out viral video updates : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एका मुलीला बेदम मारहाण करून तिला पायऱ्यांवर ढकलत असताना दिसत आहे. ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, या व्हिडिओबाबत आता नवा खुलासा समोर आला आहे. खुद्द महिला व बालविकास मंत्री यांनी या व्हिडिओची दखल घेतली असून पनवेलमधील अंगणवाडीत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक महिला अंगणवाडीतील एका चिमुकलीला लाथ मारून बाहेर ढकलते. त्यामुळे ती पायऱ्यांवर जाऊन पडते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेने हा प्रकार केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. त्यामुळे अंगणवाडीत आपल्या पाल्यांना टाकताना काळजी घ्या, असं आवाहनही याद्वारे केलं जात होतं. हा व्हिडिओ थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. त्यांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. चौकशीतून एक वेगळीच बाब समोर आली.
हेही वाचा – मराठा समाजासाठी कोणता मास्टर प्लॅन? सारथी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले काय?
“पनवेलमधील व्हायरल व्हिडिओमधील महिला अंगणवाडी सेविका नाही, ती त्या मुलीची स्वतःची आई आहे”, असं आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं.
“सोशल मीडियावर हा व्हिडिओ ‘अंगणवाडी सेविकेने मारहाण केली’ असा खोटा दावा करत वेगाने पसरत आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली. चौकशीत सत्य समोर आले, ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे. संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यांना लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. तसेच त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
तसंच, “अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील लाखो बालकांसाठी निःस्वार्थपणे झटतात. त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे”, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.





