“ही अतिशय धक्कादायक घटना”, केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपी कोठडीत आहेत. या संपूर्ण घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ही अतिशय धक्कादायक घटना असून मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची सूडबुद्धी कुठून येते’, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.
हेही वाचा – संतापजनक! अंगणवाडीतील चिमुकलीला लाथ मारून बाहेर काढलं; व्हायरल VIDEO वर आदिती तटकरेंचा मोठा खुलासा
“अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही घटना आहे. खरं तर कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकलेल्या आणि चांगल्या घरच्या मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते? या पाठिमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं या घटनेला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही, तर याकडे सामाजिक अँगलनेही पाहण्याची गरज आहे. तसेच समाजाची देखील एक चांगली आणि मजबूत व्यवस्था आपल्याला उभी करावी लागणार आहे. जेणेकरून मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची सूडबुद्धी तयार होता कामा नये”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केतन अग्रवाल या तरुणाला लोहगडावरुन धक्का देण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सिया गोयल या त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरी यानेही साथ दिल्याचा आरोप आहे. केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात आहे असं आधी भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. मात्र, केतनच्या घरातल्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि सियाने माहिती देताना केलेली गफलत लक्षात आणून दिली, तेव्हा तपासाची चक्रं फिरवली. त्यानंतर २३ जून रोजी या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली.





