महादेवाचे सर्वात उंच मंदिर या ठिकाणी, मंदिराचा महाभारताशी संबंध
भारता व्यतिरिक्त नेपाळ, भूतान आणि मॉरिशससह जगभरात महादेवाची मंदिरे

मुंबई : भारता व्यतिरिक्त नेपाळ, भूतान आणि मॉरिशससह जगभरात महादेवाची मंदिरे आहेत. तुम्हाला माहिती असेलच की भारतात महादेवाची12 ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत. ज्यांना भेट देणे हिंदू कुटुंबांसाठी एक मोठे ध्येय आहे. महाशिवरात्रीला लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात जगातील सर्वात उंच महादेवाचं मंदिर देखील आहे?
हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव तुंगानाथ आहे. तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून अंदाजे 3,680 मीटर (12,073 फूट) उंचीवर आहे. महादेवांचे हे मंदिर पंच केदार तीर्थक्षेत्रांमध्ये समाविष्ट आहे. तुंगनाथ मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला आधी सोनप्रयागला जावे लागेल. यानंतर तुम्ही गुप्तकाशी, उखीमठ, चोपटा मार्गे तुंगानाथ मंदिरात पोहोचू शकता.
महाभारताशी संबंधित आहे या मंदिराचा इतिहास
तुंगानाथचा शाब्दिक अर्थ ‘पर्वतांचा स्वामी’ असा होतो. परंतु जगातील सर्वोच्च महादेव मंदिराचा इतिहास महाभारत काळाशी जोडलेला आहे. स्थानिक लोकांच्या मते या मंदिराचा पाया अर्जुनने घातला होता. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते असेही सांगितले जाते.
अशी मान्यता आहे की महाभारत युद्धात पांडवांनी आपल्या भावांना आणि गुरूंना मारले होते. त्यामुळे ते हत्येच्या पापात दोषी होते. ऋषी व्यासांनी त्यांना सांगितले होते की महादेवांची क्षमा मिळाल्यानंतर ते त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतील.
तुंगानाथ येथील मंदिरात महादेवांचे हात सापडल्याचे सांगितले जाते. तुंगनाथ मंदिरा शिवाय पंच केदारमध्ये केदारनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला या मंदिराचे दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो असे सांगितले जाते. त्यामुळे तुम्हीही महाशिवरात्रीला महादेवांचे दर्शन घेणार असाल तर तुंगानाथ मंदिराला अवश्य भेट द्या.