“संधी साधून महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही”, रवींद्र चव्हाण यांचा ठाम इशारा

रत्नागिरी : “संधी साधून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्यांना मी प्रदेशाध्यक्ष असताना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत दिला. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपची सत्ता केंद्रापासून राज्यापर्यंत पोहोचण्यामागे तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे योगदान असल्याचे सांगत, “प्रत्येक गावात किमान पाच कट्टर विचारांचे भाजप कार्यकर्ते उभे करा,” असे आवाहन त्यांनी केले.
कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत चव्हाण म्हणाले की, तरुण रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करतात आणि त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी धार्मिक पर्यटन हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्य मंदिर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच राजापूर येथील श्री धुतपापेश्वर मंदिर यांसारख्या स्थळांचा विकास करून रोजगारनिर्मिती साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पर्यटन विकास आराखडे तयार करून पक्षाकडे पाठवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले ‘ते’ पाच खासदार कोण?
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर व रत्नागिरी परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनय नातू, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वैभव खेडेकर, ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार सूर्यकांत दळवी, तसेच उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आदी उपस्थित होते.





