“ऑटो टॅक्सी” कष्टकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य!” : शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरीत रिक्षा–टॅक्सी–कॅब चालकांसाठी भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

पिंपरी- चिंचवड : रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक बांधवांच्या आरोग्य संवर्धनासाठी पिंपरीत मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. मोरवाडी मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला चालक बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तब्बल २०० हून अधिक रिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष तथा ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते शत्रुघ्न (बापू) काटे यांचा संत तुकाराम महाराज यांची पगडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “दिवस-रात्र ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता नागरिकांना सेवा देणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. या कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे. समाजसेवेच्या भावनेतून अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देत राहू.” MNGL, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करत त्यांनी या उपक्रमामुळे चालकांना वेळेवर आरोग्य तपासणी व मोफत चष्मे मिळतील, असेही नमूद केले.
हेही वाचा – एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरणाची तरतूद नाही : शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

दरम्यान, शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे डोळ्यांची तपासणी, रंग आंधळेपणा चाचणी, मोतीबिंदू तपासणी, दृष्टीदोष तपासणी तसेच रक्तातील साखर (रँडम शुगर) तपासणी अशा विविध सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या. गरजूंना मोफत चष्मेही वाटप करण्यात आले.
डॉ. बाबा कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असून, अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन महिनाभर शहरातील विविध भागांत केले जाणार आहे.
युवा नेते शुभम कांबळे यांनी चालकांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधत, धूळ, प्रदूषण आणि दीर्घकाळ वाहन चालवण्यामुळे डोळ्यांचे विकार वाढत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे, शिवरुद्र प्रतिष्ठानचे राहुल पाखरे, पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार, तसेच विद्यार्थी विभागाचे प्रदीप आयर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारवाडी मेट्रो विभाग उपाध्यक्ष श्याम मोरे, उमेश पवार, जयेश गायकवाड, महेश शिंदे, वैभव सरोदे, गणेश नवगिरे, मल्लेश मंत्री, प्रकाश मकासरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“दिवस-रात्र ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक बांधवांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, ही खेदाची बाब आहे. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आणि त्यांना वेळेवर उपचार मिळणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. समाजातील तळागाळातील या कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच ठामपणे उभे राहू आणि अशा आरोग्य उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहू.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





