उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले ‘ते’ पाच खासदार कोण?

Uddhav Thackeray Shivsena Split MP List: उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटातील नऊ पैकी सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. रविवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत या फुटीची चुणूक दिसली. केवळ चार खासदारांनी बैठकीला हजेरी लावली होती. तर पाच खासदार गैरहजर राहिले होते. हे पाच खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती मिळत आहे. यानिमित्त हे पाच खासदार कोण आहेत? हे जाणून घेऊ.
२०२२ साली शिवसेनेत मोठी फूट पडली होती. तत्कालीन कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेना पक्षावर दावा ठोकला. सूरत, गुवाहाटी ते गोवा अशा शहरातून प्रवास करत एकनाथ शिंदेंचे बंड थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले. या बंडाला चार वर्ष होत नाहीत, तोवर पुन्हा एकदा शिवसेनेत आणखी एकदा मोठी फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे.
रविवारी (१४ जून) मातोश्रीवर पक्षाच्या ९ खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पाच खासदारांनी दांडी मारली. तर एक खासदार व्हिडीओ कॉलद्वारे बैठकीला उपस्थित राहिले. उरलेले तीन खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – सामाजिक, राजकीय आंदोलनातील ४४ खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
संजय हरीभाऊ जाधव (परभणी) – मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचे नेते असलेले संजय जाधव हे बंडू जाधव या नावाने ओळखले जातात. शिवसेनेचे मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. ते सध्या परभणीचे खासदार असून यापूर्वी त्यांनी परभणी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते.
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) – सामाजिक कार्यकर्ते असलेले भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ साली लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या वाकचौरे यांनी कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयातील संसदीय समितीवर तसेच अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर काम केले आहे.
१५ व्या लोकसभेतही त्यांनी विविध समित्यांवर काम केले होते. यात गृह, ओबीसी आणि सामाजिक कल्याण संस्थामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणकारी समित्यांचे सदस्यपद भूषविले होते.
संजय देशमुख – संजय उत्तमराव देशमुख हे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शेतकरी आणि व्यावसायिक असलेले देशमुख २०२४ साली पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. सध्या ते आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक संसदीय समितीवर काम करत आहेत.
नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आष्टीकर हे मागील रविवारपर्यंत ठाकरे गटाबरोबर होते. फुटलेल्या आणि नवा गट केलेल्या खासदारांमध्ये सहभागी होण्यासाठी ते हैदराबादमार्गे दिल्लीला गेले असल्याची माहिती समोर आली.
ओमराजे निंबाळकर – मराठवाड्यातील शिवसेनेचे तरूण तडफदार नेते अशी ओमराजे निंबाळकर यांची ओळख आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.
संजय दीना पाटील यांची भूमिका अस्पष्ट
मुंबई उत्तर – पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले संजय दीना पाटील यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. बुधवारी सकाळी संजय राऊत यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. मात्र संजय दीना पाटील हे या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. याशिवाय रविवारी झालेल्या मातोश्रीवरील बैठकीलाही ते गैरहजर होते. यामुळे संजय दीना पाटील यांच्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्तान टाइम्स संकेतस्थळाशी बोलताना ते म्हणाले, “मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मी कोणत्याही इतर पक्षात सामील झालेलो नाही आणि मी मुंबईतच आहे. गुरूवारी दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला मीदेखील हजर राहणार आहे.”
शिवसेनेच्या (ठाकरे) नऊ खासदारांपैकी सहा खासदार वेगळे झाले तरच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत होणारी कारवाई टाळता येऊ शकते. सहा पेक्षा कमी आमदार शिवसेनेतून फुटल्यास त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर संजय दीना पाटील यांनी बंडखोरांचा गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यास ही कारवाई टळू शकते.





