पोलिसांच्या रंगीत तालमीने वाहतुकीचा खोळंबा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत असून त्यानिमित्त शहरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती ज्या मार्गांवरून जाणार आहेत, त्या मार्गांवर आज पोलिसांनी रंगीत तालीम केली. तीन तास चाललेल्या या रंगीत तालमीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा, स.भु. महाविद्यालयात संविधान जागर अभियानाचे उद्घाटन आणि त्यानंतर खासदार डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी भेट, असे उपराष्ट्रपतींचे भरगच्च कार्यक्रम आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे देखील असणार आहेत. दोन व्हीव्हीआयपी शहरात येत असल्याने पोलिस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामाला लागली.
उपराष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गांवरून जाणार आहे त्या मार्गांवर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. विद्यापीठातील हेलिपॅड ते दीक्षांत सोहळ्याचे ठिकाण, तसेच विद्यापीठ सभागृह ते सरस्वती भुवन महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय ते सिडको एन-४ मधील डॉ. भागवत कराड यांचे निवासस्थान या मार्गावर संपूर्ण ताफ्याने रंगीत तालीम केली.
त्यासाठी या मार्गाला जोडणारे रस्ते बराच काळ रोखून धरण्यात आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली. वेगवेगळ्या मार्गांवर तीन तासांहून अधिक काळ ही रंगीत तालीम चालली. वाहतूक शाखेचे पाच विभाग, विशेष सुरक्षा पथक, शहर पोलिस दलाचे सुमारे २२०० अंमलदार, राखीव सुरक्षा दल, पोलिस आयुक्तालयात स्ट्रायकिंग फोर्स, श्वान पथक, गुन्हे शाखा, विशेष शाखा, रुग्णवाहिका यात सहभागी झाल्या होत्या.
संविधान जागर अभियानाचे उद्घाटन
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संविधान जागर अभियानाचे उद्घाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी (ता. २२) दुपारी साडेचार वाजता स.भु. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
असा आहे दौरा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दुपारी दीड वाजता आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने वेरूळ येथे जातील. घृष्णेश्वर मंदिर येथे पूजा व दर्शन, तेथून कैलास लेणीची पाहणी करून हेलिकॉप्टरने दुपारी ३ वाजून दहा मिनिटांनी विद्यापीठात येतील.
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (ता. २२) दुपारी ३.२० ते ४.२० या वेळेत हा समारंभ होईल. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पीएम उषा प्रकल्पांतर्गत चार इमारतींच्या भूमिपूजन फलकांचे अनावरण ऑनलाइन होणार आहे.
उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या दौऱ्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, शनिवारी (ता. २२) पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर, हॉट एअर बलून यांवर बंदी घालण्यात आली आहे.