पेपर तपासणीत होतोय हलगर्जीपणा; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणी प्रकरणी शिक्षकांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचे प्रकार उघडकीस येवू लागले आहेत. उत्तर पत्रिका तपासणीतील गोपनीयतेच्या नियमांचे पालनच शिक्षकांकडून होत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे तीस लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होत असते. विद्यार्थ्यांच्या करीअरला दिशा देण्याच्या अनुषंगाने या दोन्ही परीक्षा महत्वाच्या ठरतात. राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडून कॉपी मुक्त अभियान राबविण्याची केवळ घोषणाबाजी करण्यात आली. प्रत्यक्षात बहुसंख्य परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार घडताना उघडकीस आले आहेत. भरारी पथके, बैठी पथके यांना मात्र कॉपीचे प्रकार सापडत नाहीत. हे अजबच म्हणावे लागते.
राज्य मंडळाने उत्तर पत्रिका तपासणीसाठी कडक नियमावली ठरविलेली आहे. यंदा दहावी, बारावी या दोन्ही परीक्षांचे निकाल येत्या १५ मे पुर्वी लावण्यासाठी जोरदार हालचालीही सुरु आहेत. यासाठी उत्तर पत्रिका तपासणीचे कामकाज अनुदानित, विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच शिक्षकांना देण्यात आलेले आहे. उत्तर तपासणीसाठी मानधन कमी अन डोकेदुखी जास्त असल्याचे कारण पुढे करत काही शिक्षक हे कामकाज टाळण्याचा प्रयत्नही करताना दिसतात.
हेही वाचा – ‘सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार’; सुप्रिया सुळेंच्या विधानाने खळबळ
नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने चालत्या एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी, गोंधळ सुरु असताना तशा वातावरणातच उत्तरपत्रिका तपासण्याचा धडाका लावला होता. नवी मुंबईतील रस्त्यावर उत्तर पत्रिका पडल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर विरारमध्ये एका घरातील आगीत उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली. या घटना समोर आल्याने सर्वांना कळाल्या; मात्र यासारख्या उघडकीस न आलेल्याही काही घटना घडल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते. त्यातून शिक्षकांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
शिक्षकांनी उत्तर पत्रिका या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात बसूनच तपासणे बंधनकारक आहे. मात्र बहुसंख्य शिक्षक हे उत्तर पत्रिका तपासणीसाठी घरी नेत असल्याचे आढळून येते. मॉडरेटरही उत्तर पत्रिका घरीच घेऊन जातात. त्यामुळे दुर्देवी घटना घडत आहेत. मुख्याध्यापक शिक्षक, मॉडरेटर यांना उत्तर पत्रिका तपासणीसाठी घरी कसे काय दिल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षक, मॉडरेटर, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांची हाताळणी, जपवणुक व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे, असा सूर विद्यार्थी, पालकांकडून उमटू लागला आहे. उत्तर पत्रिका तपासणीत हलगर्जीपणा करत असलेल्या शिक्षकांवर कारवाईचे धाडस दाखविण्यात येणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी विद्यापीठांमार्फत राबविण्यात येत असलेल्या केंद्रीय मुल्यमापन कार्यक्रमाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. काही ठराविक ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीसाठी केंद्रे सुरु करुन त्याच ठिकाणी उत्तर पत्रिका तपासणी, मॉडरेशनचे सर्व कामकाज पुर्ण करण्याच्या अनुषंगाने कार्य पध्दती वापरली पाहीजे. यातून उत्तर पत्रिकांची गोपनीयताही बाळगता येवू शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे.