ताज्या घडामोडीमुंबई

मतदान करताना घोळ घातलात तर कारवाई होणार

मुंबई| राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड असतानाही शिवसेनेच्या संजय पवार यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना कमालीची सावध झाली असून पक्षाकडून शक्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमदाराचे मत बाद होण्याची चूक शिवसेनेला परवडण्यासारखी नाही. शिवसेनेकडे सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोघांना निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं आहेत. यापैकी कोणतेही मत बाद ठरू नये, यासाठी शिवसेनेकडून आमदारांना विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने सेनेला एक मत कमी मिळाले. त्याचा पक्षाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत कोणत्याही आमदाराकडून पुन्हा तशी चूक होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. एवढे करूनही कोणत्या आमदाराने मतदानावेळी चूक केलीच तर त्याला कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. शिवसेनेकडून यासंदर्भात आमदारांना सक्त ताकीदच देण्यात आलेली आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना सध्या पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व आमदारांची हॉटेलवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदारही उपस्थित होते. या सगळ्यांची शनिवारी रंगीत तालीम पार पडली. यात सर्व आमदारांना प्रत्यक्ष मतदान कसे करावे; तसेच मतदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात याचे प्रात्याक्षिक देण्यात आले. त्यासाठी मतदानासाठी डमी मतपेटीसुद्धा ठेवण्यात आली होती.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसेनेकडून विधानपरिषद निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल. दोन उमेदवारांना ५४ मतं दिल्यानंतर शिवसेनेकडे अतिरिक्त मतं शिल्लक राहतात. त्यामुळे आता शिवसेना आपल्या उमेदवारांसाठी किती अतिरिक्त मतांचा कोटा ठरवणार, हे पाहावे लागेल. शिवसेनेची रणनीती गुप्त राहावी, यासाठी आमदारांना सोमवारी सकाळीच मतांचा कोटा कितीचा राहील, याबाबत माहिती दिली जाईल, अशी चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त मतांचा कोटाच निर्णायक ठरला होता. शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची जास्त मतं मिळाली होती. पण भाजपच्या धनंजय महाडिक यांनी अतिरिक्त मतांच्या जोरावर बाजी मारत डाव पलटवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button