ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

फडणवीसांना विश्वास, महायुती ४० हून अधिक जागा जिंकणार!

मोदींच्या सभांमुळे भाजप महायुतीसाठी पोषक वातावरण

मुंबई : ‘जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यांची मागील १० वर्षांतील कामगिरी पाहता, राज्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या जागा तर आम्ही राखूच, शिवाय त्यापेक्षा अधिक म्हणजे चाळीसहून जास्त जागांवर विजय मिळवू’ असा विश्वास भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केला.

राज्यातील ४८ पैकी १६ लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यावर भाजप महायुतीसाठी पोषक वातावरण नसल्यानेच मोदींना महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घ्याव्या लागत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. फडणवीस यांनी या टीकेला यावेळी उत्तर दिले.

‘विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोक उत्सुक नाहीत. आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहे. सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींच्या जेवढ्या सभा झाल्या, तेवढ्याच यंदाही होत आहेत. एखाद् दुसरी जास्त असेल. फरक एवढाच की पूर्वी मोदी दिवसाला एक-दोन सभा घ्यायचे, त्याऐवजी यंदा तीन-तीन सभांना संबोधित करीत आहेत. आमच्या नेत्याला ऐकण्यास नागरिक उत्सुक असतात. त्यामुळे गर्दी होते. मग मोदींना का बोलावू नये? विरोधकांकडे गर्दीच जमत नाही’, अशी टीका त्यांनी केली.

‘उद्धव-भाजप जवळीकतेची शक्यता नाही’
पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल नुकतेच प्रेम व्यक्त केल्याने भाजप-ठाकरेंतील दुरावा कमी होतोय का, या प्रश्नावरही फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले. ‘उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना शिवसेनेशी आमचा टोकाचा संघर्ष होता. त्यांनी विश्वासघात केल्याने हा संघर्ष होता. मात्र, तरीही मोदी एक दिवसाआड उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस त्यांच्या पत्नीकडे करीत होते. ही माणुसकी आहे’ असं फडणवीस म्हणाले.

‘आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत, तर केवळ राजकीय, वैचारिक विरोधक आहोत. उद्या उद्धव यांना वैयक्तिकदृष्ट्या काही मदत लागल्यास मी ती करेन; पण त्यांनी बाळासाहेबांचे विचार त्यागले असल्याने राजकीयदृष्ट्या मदत करणार नाही’, असे मोदी यांनी म्हटले आहे. राहिला प्रश्न पुन्हा जवळीक निर्माण होण्याचा, तर तशी शक्यता मला तरी दिसत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button