ताज्या घडामोडीमुंबई

बिबळ्या जखमी झाल्याने पाय गमावला

 मुंबई | बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांच्या विशेष अपंगालयात सध्या एक बिबळ्या लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तारेच्या फासात पाय अडकून हा बिबळ्या जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एक पाय गमावल्यानंतरही बिबळ्याच्या जलद हालचाली पूर्ववत सुरू झाल्या आहेत. पूर्वीच्याच जोशात बिबळ्या वावरत असून त्यामागे उद्यानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कारणी लागले आहेत.

विरारजवळील काशिद कोपर गावात ३० मार्च रोजी एक बिबळ्या जखमी अवस्थेत आढळला होता. तारेच्या फासात पाय अडकल्याने हा बिबळ्या जखमी झाला होता. सुमारे पाच वर्षे वयाच्या या बिबळ्याच्या पायास झालेली जखम पाहून त्यास पुढील उपचारांसाठी राष्ट्रीय उद्यानात आणले. त्यावर उपचारांसाठी वन विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनेही लक्ष दिले. त्यानुसार त्याच्यावर २२ दिवस उपचार करण्याचे ठरविण्यात आले. बिबळ्यास झालेल्या जखमांमधून गँगरिन होण्याची भीती लक्षात घेत शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नामवंत डॉ. वाकणकर, डॉ. मनीष पिंगळे, प्रज्ञा पेठे, डॉ. शैलेश पेठे यांच्यासह वैद्यकीय चमूने शस्त्रक्रिया करून बिबळ्यास जीवदान दिले. बिबळ्याच्या पायावर खांद्यापासून शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची विशेष काळजी घेण्यात आली. बिबळ्याने शस्त्रक्रियेच्या ठिकाणी पायांच्या नखांनी जखम करू नये यासाठी काळजी घेण्यात आली. अशा प्रसंगात वन्यजीवांच्या पायांची नखे कापली जातात. तरीही अन्य कोणत्याही मार्गाने शस्त्रक्रिया केलेल्या भागास दुखापत होऊ नये यासाठी तिथे २४ तास कर्मचारी नेमण्यात आले. कालांतराने जखम सुकल्यानंतर बिबळ्याला अपंगालयातील बंदिस्त जाळ्यांआड असलेल्या मोकळ्या जागेत सोडण्यास सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित असून बिबळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. आता बिबळ्या अपंगालयातील उपलब्ध मोकळ्या जागेत हा बिबळ्या वावरत आहे. वन्यजीव परिस्थितीनुरूप बदल स्वीकारत असल्याचे हे उदाहरण ठरले आहे. हा बिबळ्या आता पूर्वीच्याच जोशात नियमितरित्या वावरत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button