पिंपरी / चिंचवड

रस्ते आणि रेल्वेसह अनेक प्रश्न मार्गी लावले – खासदार बारणे

पिंपरी: मावळ लोकसभा मतदार संघातील गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले आहेत. मतदार संघात अनेक विकास कामे सुरू आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन, बोपखेल अशा विविध प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात रेडझोनसह सरंक्षण खात्यासंदर्भातील सगळे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. तसेच अनेक प्रलंबित कामांना गती देण्याचे काम केले असल्याचेही, ते म्हणाले.

श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहूल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुठे, अॅड. सचिन भोसले, सल्लागार भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

लोकसभेचा सदस्य झाल्यापासून लोकसभेमध्ये आत्तापर्यंत 762 तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित केले तसेच 222 वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला आहे. तर 12  महत्वाच्या विषयांवर खाजगी विधेयके मांडली. लोकसभेतील एकूण उपस्थिती  92 टक्के राहिली आहे. मावळ लोकसभा मतदार संघासह देशातील जनसामान्यांच्या संदर्भातील, जिव्हाळ्याचे विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले, असल्याचे बारणे यांनी सांगितले. सर्वाधिक चर्चेत सहभागी होणारा देशभरातील मी एकमेव खासदार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

पुणे-लोणावळ तिसरा रेल्वे महामार्ग सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यासाठी बजेटमध्ये 1250 कोटी रुपयांची तरतूद केली. अपघात होत असल्याच्या कारणावरून ऐतिहासिक माथेरान रेल्वे केंद्र सरकाराने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाठपुरावा करून माथेरान रेल्वे चालू केली. सीएसटी पनवेल मेट्रो मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

पुणे-लोणावळा लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि बाकडे बसविण्यासाठी निधी दिला आहे. आकुर्डी रेल्वेस्टेशन किंवा चिंचवड रेल्वेस्टेशन येथे सब ‘जंक्शन’ सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मावळ परिसरातील  गावांतील रस्त्यांचा प्रश्न सोडविला आहे.  तळेगाव- शिक्रापुर- दौंड हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात घोषित करण्यात आला असून त्याचे काम सुरु असल्याचेही, बारणे यांनी सांगितले.

…संकोच वृत्ती न ठेवल्यास दिल्लीत रुळणे अवघड नाही!

महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत रुळत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु, बारणे यांनी गेल्या तीन वर्षात मतदार संघातील अनेक प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली आहे. याबाबत विचारले असता बारणे म्हणाले, संकोच वृत्ती कधीच ठेवली नाही. अभ्यास वृत्ती ठेवली. महाराष्ट्रातील खासदार लोकसभेतील कामकाजात सहभागी होतात. त्यांना काहीच अडचण येत नाही. तसेच काम करणा-यांना कुठेही अडचण येत नाही. संकोच वृत्ती न ठेवल्यामुळे मी चांगले काम करू शकत असल्याचे, बारणे म्हणाले.

लोकसभेच्या उन्हाळी अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, शेतकरी कर्जमुक्ती, शहीद जवनांना भरीव आर्थिक मदत,  अमेरिकेमध्ये भारतीय व्यावसायिकांवर होत असलेले हल्ले, ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान केल्यानंतर मतदाराला स्लीप मिळावी, बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार यादीला आधार कार्डचा नंबर जोडावा, महाराष्ट्रातील शेतक-यांना शेतीसाठी 24 तास वीज मिळावी, तळेगाव दाभाडे येथील मिसाईल प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे शेतक-यांना कधी मिळणार, देशातील केंद्रीय विद्यालयांची संख्या वाढवावी? आदी विषयावर आवाज उठविला, असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. अधिवेशन कालखंडात 97 टक्के उपस्थिती आणि सर्वांधिक प्रश्नांवर होणा-या चर्चेत सहभागी होणारा राज्यातील पहिले खासदार ठरलो असल्याचेही, त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button