breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीच्या वाघेरेंचा ‘सॉफ्ट’ स्वभाव; महायुतीच्या बारणेंसाठी ‘हार्ड’ निवडणूक! 

ग्राऊंड रिपोर्ट: मावळ लोकसभेत वाघेरे यांची मतदारांशी ‘कनेक्टिव्हिटी’ तुलनेत जास्त

पिंपरी : विशेष प्रतिनिधी

लोकांसोबत सहजतेने सुसंवाद साधत ‘कनेक्टिव्हिटी’ जोडण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यशस्वी होताना दिसत आहेत. वाघेरेंचा हा ‘सॉफ्ट’ चेहरा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. खासदार बारणे यांना यंदाची निवडणूक ‘हार्ड’ असल्याचे राजकीय चित्र आहे. खा. बारणेंच्या प्रचार सभांना लोकांचा कमी होणारा प्रतिसाद, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारी उदासीनता यावरून हे वास्तव अधोरेखित होत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव करणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव देशभरात चर्चेत आले होते. भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार बारणे लढले होते. तेव्हा शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्याचा फायदा खासदार बारणे यांना झाला. मात्र कालांतराने राज्यभरातली राजकीय परिस्थिती बदलली. त्यामध्ये खासदार बारणे यांनी त्या राजकीय भूमिकेनुसार आपली राजकीय चाल खेळली. मात्र ही चाल त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदार बारणे देखील सत्तेत सामील झाले आहेत. मात्र, त्यामुळे मावळ लोकसभेत त्यांची चांगलीच राजकीय गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार बारणे यांना पहिल्या टप्प्यातच उमेदवारीसाठी झगडावे लागल्याचे मतदारसंघाने पाहिले. उमेदवारी मिळेल की नाही ? मतदार संघ कोणत्या पक्षाला सोडला जाईल ? भाजपामधून तसेच राष्ट्रवादी मधून वाढता विरोध ही सर्व परिस्थिती हाताळत अखेरच्या टप्प्यात बारणे यांना तिकीट जाहीर झाले. त्यांना तिकीट मिळाले असले तरी या मतदारसंघात चाललेल्या राजकीय नाट्यमय परिस्थितीमुळे महायुतीच्या राजकीय ‘‘इमेज ब्रॅण्डिंग’’ मध्ये नकारात्मक स्थिती निर्माण झाली. त्याचा फायदा महाविकास आघाडीने घेतला.

महाविकास आघाडी मधील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेत निर्माण झालेली राजकीय ‘स्पेस’ हेरत माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ती जागा घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाघेरे शिवसेनेत दाखल झाले. त्यांना पहिल्याच टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली. त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीने अगोदरपासूनच प्रचाराचे रान उठवले. वाघेरे यांचे खासदार बारणे यांच्या तुलनेत जनतेशी सहज सुसंवाद साधण्याची कसब आहे. लोकांमध्ये मिसळून ते संवाद साधत आहेत. त्यांची क्लीन इमेज त्यांना फायदेशीर ठरत आहे. मावळ लोकसभेत त्यांची मोठी नातीगोती आहेत. या बरोबरच खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बबत असणारी सहानुभूती वाघेरे यांना फायद्याची ठरत आहे. त्यामुळे मावळ लोकसभेत खासदार बारणे यांना फटका बसू शकतो, अशी राजकीय चर्चा होत आहे.

पक्ष बदलण्याचा बारणे यांना तोटा ?

वेगवेगळ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवत आपला राजकीय आलेख वाढवण्याचे कसब खासदार श्रीरंग बारणे यांना जमले असल्याचे अनेक राजकीय जाणकार सांगतात. पूर्वी काँग्रेस मधून ते नगरसेवक झाले. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दोन वेळा खासदार झाले. शिवसेनेच्या फुटी नंतर ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. मावळ लोकसभेत भाजपाकडून कमळावर लढण्याचे त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. खासदार बारणे यांच्या या बदलत्या राजकीय भूमिकेचा एका बाजूला त्यांना फायदा झाला असला तरी यंदा मात्र त्यांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या प्रति इतर पक्षातील निष्ठावंतांची नाराजी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट दिसेल अशी परिस्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button