breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे-पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदांच्या निवडी एकत्रित होणार?

भाजपच्या शहराध्यपदांच्या निवडी झाल्या पण राष्ट्रवादीला मुहूर्त मिळेना

अजित पवार यांच्या बोटचेपी भूमिकेमुळे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

          महाराष्ट्राच्या सत्तेतून भारतीय जनता पार्टीला बाहेर बसावे लागले. सर्वाधिक आमदार असतानाही विरोधी बाकावर बसावे लागलेल्या भाजपाने खचून न जाता पक्ष संघटनेवर बारीक लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, सत्ता आणि हारतुरे घेण्यात व्यस्त असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

          विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर काही दिवसांत सत्तेचे चित्र स्पष्ट झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने तात्काळ संघटनात्मक बांधणीवर भर दिला. राष्ट्रवादीचा ‘डोळा’ असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकांच्या निवडणुका दोन-अडीच वर्षांवर आल्या आहेत. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे आणि पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

          आमदार लांडगे आणि मुळीक दोघेही ‘यंग’ आहेत. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ‘डिसिझन मेकर’ नेते अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पीसीएमसी म्हणून जिव्‍हाळ्याचा विषय आहे. या दोन्ही महापालिकांवर अजित पवार यांना वर्चस्व मिळवायचे आहे. पण, सध्यस्थितीला पक्षाकडे संघटनात्मक बांधणीसाठी नवीन चेहरा देता आलेला नाही. पुण्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याला शहराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पुणे शहर राष्ट्रवादीत बदल करण्याच्या हालचाली पक्षनेतृत्वाने केल्याचे सांगण्यात येत आहे. शहराध्यक्षांसह आणखी काही पदे बदलण्याचा अंदाज अजित पवार यांनी मांडताच नव्या पदांसाठी इच्छुकांनी “लॉबिंग’ही करण्यास सुरवात केली आहे. 

****

          पिंपरी-चिंचवडचे भिजत घोंगडे…

पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक पदांच्या निवडीकडेही पक्षनेतृत्त्वाने दुर्लक्ष केले आहे. लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव पक्षा जिव्‍हारी लागला आहे. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात पक्षाला पिछाडीवर रहावे लागले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला चिंचवडमधून उमेदवारही मिळाला नाही. पिंपरी मतदार संघ आमदार आण्णा बनसोडे यांनी राखला. पण, भोसरीत पक्षाला अधिकृत उमेदवार देता आला नाही. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी धुळधान झाली. पक्ष संघटना खिळखिळी झाली असताना राज्यात सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना काहीशी उर्जा मिळाली आहे. आता पक्षनेतृत्त्वाने संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल, अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button