ताज्या घडामोडीमुंबई

मास्क लावा आणि फसवणूक टाळा; पालिका कर्मचारी यांच्याकडून करण्यात येणारी कारवाई

मुंबई | प्रतिनिधी

करोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. मात्र मास्क न लावणाऱ्यांवर पोलिस, पालिका कर्मचारी यांच्याकडून करण्यात येणारी कारवाई नेहमीच वादाचा विषय ठरली आहे. सध्या दंडात्मक कारवाई काही प्रमाणात थंडावली असली तरी मास्कसक्तीच्या नावाखाली तोतयांकडून सर्वसामान्य लोकांची लुबाडणूक सुरूच आहे.

विक्रोळीतील ७२ वर्षीय रघुनाथ हे वीज बिलाचा भरणा करून सायकलवरून घरी परतत होते. त्यांच्या सोसायटीच्या गेटजवळ दोन तरूण उभे होते. या दोघांनी रघुनाथ यांना हाक देताच त्यांनी सायकल थांबवली आणि दोघांजवळ गेले. तुम्ही आम्हाला ओळखले नाही का? आम्ही स्पेशल पोलिस आहोत. तुमच्या परिसरात नाक्यानाक्यांवर उभे असतो, असे सांगून तुम्ही मास्क का लावला नाही? अशी विचारणा केली. त्यावर रघुनाथ यांनी विसरल्याचे सांगितले. यापुढे मास्क लावत जा असे सांगतानाच त्यांनी रघुनाथ यांच्यापुढे एक पेपर धरला आणि गळ्यातील सोन्याची चेन आणि ब्रेसलेट काढून ठेवण्यास सांगितले. या वयात दागिने घालून एकटे फिरू नका, असे सांगून कागदाची पुडी हातात देऊन निघून गेले. रघुनाथ यांनी घरी जाऊन पुडी उघडली त्यावेळी त्यामध्ये दागिन्यांऐवजी कागदाचे बोळे सापडले. रघुनाथ यांनी या फसवणुकीबाबत विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

मोबाइल हिसकावला

कडियाकाम करणारा शकिल शेख हे काम आटोपून चारकोप येथून घरी परतत होता. चालताना मास्क थोडे खाली आलेले पाहून एक तरूण त्याच्याजवळ आला आणि मागोमाग दुसरा मोटारसायकलवरून आला. आम्ही पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून १ हजार रूपये दंड भरावा लागेल, असे दोघे शकील याला सांगू लागले. इतकी रक्कम नसल्याचे सांगताच त्यांनी शकीलकडील मोबाइल हिसकावून घेतला. मालवणी पोलिस ठाण्यात येऊन दंड भर आणि मोबाइल घेऊन जा, असे सांगून निघून गेले. शकिल मित्रासोबत मालवणी पोलिस ठाण्यात गेला असता असे कुणीच अधिकारी नसून त्यांनी चारकोप पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शकीलने तोतया पालिका कर्मचाऱ्यांविरूद्ध पोलिसात तक्रार केली.

मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या पवई येथील कर्मचाऱ्याला दोन तोतया पोलिसांनी अडवले. तुम्ही मास्क का लावला नाही, अशी विचारणा या दोघांनी करताच या गृहस्थाने सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कारण सांगितले. यावरून बोलण्यात गुंतवून या गृहस्थाकडून सोन्याची चेन घेऊन हातचलाखीने गायब केली. घरी गेल्यावर या तोतया पोलिसांनी सोन्याची चेन पळविल्याचे या गृहस्थाच्या लक्षात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button