TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेप

कसब्यात विजयाची खात्री नव्हती : शरद पवार

पुणे: कसब्याचा भाजपचा बालेकिल्ला भेदणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कसब्यातील महाविकास आघाडीच्या यशाचे गमक सर्वांपुढे उलगडले. मला स्वत:ला कसब्यात विजय मिळेल, याची खात्री नव्हती. त्याचं कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाग भाजपचे गड म्हणून ओळखले जातात. तिथे अनेक वर्षे गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले आहे. कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल, असे आमच्यातील सर्वांनाच वाटत होते. सामान्य लोकांकडून तसे ऐकायला मिळत होते. पण मला स्वत:ला कसब्यात विजयाची खात्री नव्हती. कारण गिरीश बापट यांच्या जनसंपर्कामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला झाला होता. परंतु, रवींद्र धंगेकर यांना समाजातील सर्व स्तरांवर असलेल्या मान्यतेमुळे कसब्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. उत्तम उमेदवार, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीतील सर्व घटकांचे मनापासून लढणे, या सर्व गोष्टी जुळून आल्याने आम्हाला यश मिळाले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कसब्यातील विजयाचे विश्लेषण केले.

बापट हे स्वत: सतत लोकांमध्ये मिसळणारे होते. गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजप बाहेरील घटकांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गिरीश बापट यांचे लक्ष्य केंद्रित असलेला या मतदारसंघात विजय मिळणे जड जाईल, असे मला वाटत होते. पण शेवटच्या टप्प्यात गिरीश बापट आणि टिळकांना डावलून भाजपने काही निर्णय घेतले. त्याचा फायदा होईल, असे सर्वांना वाटले. तो अंदाज खरा ठरला, असे शरद पवार यांनी म्हटले.

पेठांमधील मतदारही रवींद्र धंगेकरांच्या पाठिशी उभे राहिले, कारण…
मी निवडणूक झाल्यानंतर माहिती घेतली तेव्हा अनेकांनी सांगितलं की, रवींद्र धंगेकर यांनी वर्षानुवर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. अनेकांनी हे सांगितलं की, हा उमेदवार चारचाकी नव्हे दुचाकीवरून फिरतो. धंगेकर यांच्याबाबत कसब्यातील मतदार उत्तम बोलत होते. पेठांमध्ये काँग्रेसची मतं कशी वाढली, हेदेखील मी विचारले. तेव्हा बहुतांशी लोकांनी सांगितलं की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्व स्तरावर मान्यता होती. लोकांनी रवींद्र धंगेकर यांच्या कामाची दखल घेतली होती. याशिवाय, कसब्यात झालेला धनशक्तीचा वापर अनेकांना रुचला नाही. काही लोकांनी मला मोबाईलवर नोटांची बंडलं दाखवली. हे लोक राजकारणाबाहेरचे होते. कसब्यातील अनेकजण हेच म्हणाले की, आम्ही डोळ्यांनी पैशांचे वाटप होताना पाहिले. तेव्हा आम्ही भाजपला मत न देण्याचा निर्णय घेतला. धनशक्तीचा वापर पारंपरिक मतदारांना रुचलेला नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button