ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस
प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले

दुबई : टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवला. 9 महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले. टीम इंडियाने 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले. या विजायसाह चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल 12 वर्षांनंतर भारतात परतत आहे. या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंड संघाला बक्षिसाची मोठी रक्कमही मिळाली.
टीम इंडियाला सर्वात मोठं बक्षीस
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 वर्षांनंतर झाली, यापूर्वी ही स्पर्धा 2017 मध्ये खेळवण्यात आली होती. यंजा आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण बक्षीस रक्कम 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ठेवली होती, जी आवृत्तीच्या तुलनेत 53% आहे. यातून स्पर्धेतील विजेत्या संघाला सर्वाधिक वाटा मिळाला. टीम इंडियाला चॅम्पियन बनण्यासाठी 2.24 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये देण्यात आले, जी या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले. दुसरीकडे, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये देखील मिळाले.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या संघालाही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली. यावेळी उपविजेता ठरलेल्या न्युझीलंडच्या संघाला 1.12 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये मिळाले. तर, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अंदाजे प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर ग्रुप स्टेजमध्ये सहभागी झालेले संघही रिकाम्या हाताने परतले नाहीत. बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांना 3.5 लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 3 कोटी रुपये मिळाले. याशिवाय पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना 1 लाख 40 हजार डॉलर म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये देण्यात आले. या सर्व टीम्सना 34 हजार डॉलर्स म्हणजे ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे 30 लाख रुपये आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले.
टूर्नामेंटमध्ये भारतीय संघ अजिंक्य
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या स्पर्धेत कोणत्याही संघाला भारताचा पराभव करता आला नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. तसेच ग्रुप स्टेजमधील तीनही सामने जिंकणारा भारताचा एकमेव संघ होता. यानंतर, भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले, आणि फायनलमध्ये पुन्हा एकदा किवी संघाचा सामना केला. मात्र यावेळीही भारतीय संघानेच उत्तम खेल करत वर्चस्व राखले आणि सामना 4 गडी राखून जिंकून टीम इंडिया चॅम्पियन ठरली.