शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटपाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. दोन वर्षांपासून रखडलेले हे काम महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पाठपुराव्याने मार्गीॅ लागले असून, फेरीवाल्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर प्रमाणपत्राचा कालावधी 5 वर्षाचा असा उल्लेख करत मागील दोन वर्ष सोडून आता 2029 सालापर्यंत हे प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सन 2022 मध्ये शहरातील फेरीवाले , पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 15 हजार 13 फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यापैकी 50 टक्के फेरीवाल्यांनी 1 हजार 400 रुपये शुल्क संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा केले होते. मात्र सर्वेक्षण होऊन दोन वर्षे उलटूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने आयुक्त शेखर सिंह याच्याकडे केली होती. याची दखल घेत, आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेच्या सर्व क्षत्रिय कार्यालयांमध्ये फेरीवाला प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे.
हेही वाचा – अचानक मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल; डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशन वरील प्रकार
पिंपरी चिंचवड महापालिका व क्षेत्रीय कार्यालयामध्ये ब क्षत्रिय अधिकारी अमित पंडित यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात फेरीवाला प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. . यावेळी शहर पथ विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, सलीम डांगे, अलका रोकडे, किसन भोसले, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सलीम हवालदार, नंदू आहेर, बालाजी लोखंडे,सिद्धाराम गवंडी रामेश्वर मस्के महादेव सवने आदी उपस्थित होते. 15 हजारांपैकी केवळ 8 हजार फेरीवाल्यांनी शुल्क भरले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील फेरीवाले व व्रिकेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात 15 हजार 13 फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ 8 हजार फेरीवाल्यांनी 1 हजार 400 रुपये शुल्क संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा केले आहेत उर्वरित पथविक्रेत्यांनी शुल्क भरून प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहनही नखाते यांनी केले आहे.