Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी ९ तासांचा ‘विशेष ब्लॉक’; अनेक एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या रद्द

पुणे | पुणे रेल्वे स्थानक परिसरात पायाभूत सुविधांच्या आणि महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी (१४ जून) नऊ तासांचा ‘विशेष ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस तसेच लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्या खडकी आणि हडपसर स्थानकातून सोडल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण नऊ तास असणार आहे. या कालावधीत इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीची कामे केली जातील. या ब्लॉक दरम्यान मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट (प्लॅटफॉर्म) क्रमांक तीन आणि चार उपलब्ध नसतील. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे वाहतुकीतील महत्त्वाचे बदल

वळविण्यात आलेल्या गाड्या

  • पुणे – जयपूर एक्स्प्रेस आता पुणेऐवजी खडकी स्थानकावरून सुटेल.
  • पुणे – सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस ही गाडीही खडकी स्थानकावरून सोडली जाईल.
  • पुणे – कोल्हापूर एक्स्प्रेस पुणेऐवजी सातारा स्थानकावरून धावेल.

खडकी स्थानकावर थांबणाऱ्या (टर्मिनेट होणाऱ्या) गाड्या

  • जयपूर – पुणे एक्स्प्रेस
  • सीएसएमटी मुंबई – पुणे एक्स्प्रेस

हडपसर स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या

  • जम्मू तावी – पुणे झेलम एक्स्प्रेस
  • अमरावती – पुणे एक्स्प्रेस

हेही वाचा

मोठी दुर्घटना! आसाममध्ये भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ विमान कोसळले

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी

रद्द एक्स्प्रेस गाड्या

  • पुणे – नागपूर एक्स्प्रेस
  • नागपूर – पुणे एक्स्प्रेस
  • मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
  • पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

रद्द लोकल आणि डेमू (DEMU) गाड्या

  • पुणे – तळेगाव लोकल आणि तळेगाव – पुणे लोकल
  • बारामती – पुणे डेमू
  • पुणे – दौंड डेमू
  • सातारा – पुणे डेमू

रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

पुणे यार्ड येथील रेल्वे वाहतुकीची भविष्यातील सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे पायाभूत सुविधांचे काम अत्यंत आवश्यक आहे. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी इंडियन रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टल www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा मोबाईलमध्ये NTES ॲप डाऊनलोड करून आपल्या गाडीची अचूक सद्यस्थिती आणि अद्ययावत वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button