मंत्री असण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारस म्हणून लोकांचा जास्त विश्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले

पुणे | ‘लोकांचा माझ्यावर मंत्री म्हणून असलेल्या विश्वासापेक्षा छत्रपतींच्या घराण्याचा वारस म्हणून जास्त विश्वास आहे. सत्ता, आमदारकी किंवा मंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. छत्रपतींच्या घराण्याचा सदस्य असणे, हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे,’ अशी भावना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. आता इतिहास जगण्याची वेळ आली असून, शिवरायांच्या इतिहासातून शिकून पुढील पिढ्यांनी दैनंदिन आयुष्यात ती मूल्ये स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज – द्रष्टे व्यवस्थापक’ या विशेष कार्यशाळेचे उद्घाटन शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे आणि प्रा. संजय चाकणे उपस्थित होते.
हेही वाचा
भारताचे अजिंक्य ‘संरक्षण कवच’! DRDO कडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आजवर जो इतिहास सांगितला गेला, त्यात ठरावीक प्रसंग असतात. मात्र, त्या पलीकडेही शिवरायांचे काम मोठे आहे. अमेरिका, रशियासारख्या महासत्ता एका लढाईतच अडचणीत आल्या. पण, शिवरायांनी एका वेळी तीन लढाया लढल्या. त्यासाठी तयारी कशी केली, कोणताही वाढीव कर लावला नाही. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य होते. शिवरायांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले. रयतेचे राज्य हा त्यांचा विचार होता. त्यांनी केवळ राज्यविस्तार केला नाही, तर जनतेवरचा अन्याय दूर केला. त्यांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील सहकाऱ्यांना कर्तृत्वानुसार जबाबदाऱ्या सोपवल्या. युनेस्कोने आपल्या गडकिल्ल्यांची दखल घेणे हा महाराष्ट्राचा गौरव आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले.
शिवरायांचे चारशे वर्षांपूर्वीचे व्यवस्थापन आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. गडकिल्ल्यांसाठी जागा निवड, त्याचे भूशास्त्र, वास्तूरचना, जलव्यवस्थापन, बांधकाम अशा वेगवेगळ्या प्रकारचा विचार शिवरायांनी केल्याचे दिसते. शिवरायांबाबत दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम करता येईल का, याचा विचार करता येईल. त्याद्वारे शिवरायांचे पैलू विद्यार्थी समजून घेऊ शकतील, असे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी सांगितले.





