होळीच्या सुट्टीमुळे आणि लॉन्ग विकेंडमुळे देशभरात प्रवासाची लाट
लीला पॅलेससारख्या हॉटेल्समध्ये एका रात्रीचे भाडे 45,000 रुपयांपर्यंत

मुंबई : यंदा येत्या 14 मार्च रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. त्याआधी लॉन्ग विकेंड येत असल्याने नोकरदार भलतेच खूश आहेत. एकीकडे स्टेशन आणि बस स्थानकांवर घरी जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे काही लोक या विकेंडचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत. लॉन्ग विकेंड येत असल्याने बाहेर जाऊनच होळी साजरी करण्याचा अनेकांचा प्लान आहे. त्यामुळे अनेकांनी हॉटेल बुकींग सुरू केलं आहे. त्यामुळे अचानक हॉटेल हाऊसफुल्ल झाले असून रूम मिळणंही मुश्किल झालं आहे.
आधीच आलेल्या सुट्ट्या आणि त्यात होळी यामुळे अनेकांनी यंदा बाहेर जाऊनच होळी साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यापासून हॉटेल सर्च आणि त्याच्या भाड्यात अचानक वाढ झालेली दिसत आहे. लोकांची हॉटेलच्या रूमची मागणी अचानक वाढल्याने हॉटेलचं भाडं कमालीचं वाढलं आहे.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
लीला पॅलेसचं भाडं काय?
Rategainच्या रिपोर्ट्सनुसार, वेस्टिन रिजॉर्ट अँड स्पा हिमालय आणि लीला पॅलेस उदयपूर सारख्या हॉटेलांमध्ये होळीच्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी एका दिवसाचं भाडं 45 हजाराहून अधिक झालं आहे. रेटगेनच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हॉटेलच्या बुकिंगमध्ये 105 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
SOTC Travel नुसार, यंदा होळी आणि लॉन्ग विकेंडमुले ऑनलाईन सर्चमध्ये 30 टक्क्याने वाढ झाली आहे. सर्वाधिक लोक वृंदावन, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगाल आदी ठिकाणं सर्च करत आहेत. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जाण्यासाठी विमानाच्या तिकीटातही 5 ते 8 टक्क्याने वाढ झाली आहे.
होळी साजरा करण्याचा जोश
शहरातील लोक होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यास उत्सुक आहेत. ते जयपूरमध्ये होळी एलिफंट फेस्टिव्हल, केरळमध्ये मंजल कुली आणि पंजाबमद्ये होला मोहल्लासारख्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छित आहेत. होला मोहल्ला हा शीख योद्ध्यांच्या पराक्रमाचा उत्सव आहे. तर पश्चिम बंगालमधील डोलयात्रा (बसंत उत्सव) सुद्धा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.
दिल्ली, मुंबईलाही पसंती
थॉमस कुकच्या मते, दिल्ली आणि त्याच्या आासपास राहणारे लोक आसपासच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत. नौकुचियाताल, मुन्स्यारी, कांगडा आणि कनाताल सारख्या ठिकाणी फिरायला जाण्याचा ते प्लान करत आहेत. महाराष्ट्रातील लोक राजमाची, इगतपुरी, लोणावळा, माथेरान आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जाण्याचा बेत आखत आहेत.