पंतप्रधान मोदींच्या यशस्वी तपपूर्ती निमित्त जनकल्याण शिबीर!
आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार; विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या यशस्वी १२ वर्षांच्या प्रवासानिमित्त भोसरी, पिंपरी-चिंचवड येथे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने नागरिकांसाठी भव्य जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १५ जून २०२६ ते बुधवार, दि. १७ जून २०२६ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हे शिबिर आमदार महेश लांडगे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, शितलबाग, पुणे–नाशिक रोड, भोसरी येथे पार पडणार आहे. या शिबिरामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती, नोंदणी तसेच थेट लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा
पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी ९ तासांचा ‘विशेष ब्लॉक’; अनेक एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या रद्द
या जनकल्याण शिबिरात ई-श्रम कार्ड नोंदणी, आयुष्मान भारत (PM-JAY) आरोग्य कार्ड, ABHA आरोग्य खाते, प्रधानमंत्री मानधन योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयुष्मान भारत कुटुंब कार्ड आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. या जनकल्याण शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांसाठी विशेष पिंक ई-रिक्षा योजना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष पिंक ई-रिक्षा योजना राबवली जाणार असून या योजनेत केवळ ₹5,000 डाउन पेमेंट, तीन दिवसांत थेट डिलिव्हरी, दरमहा ₹30,000 पेक्षा अधिक उत्पन्नाची संधी, मोफत प्रशिक्षण, चार्जिंग लायसन्स व विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी वाहन परवान्याची आवश्यकता नाही.
“केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक जनकल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हे माझे कर्तव्य आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण पीएमआर परिसराचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मोदी सरकार काम करीत आहे. ‘विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या मूल्यांवर चालत प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाभिमुख हिंदुत्वाचा संदेश देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





