एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

तळेगाव दाभाडे : गावागावांत पोलीस आणि नागरिकांमधील परस्परसंबंध अधिक दृढ करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने ‘एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार’ या नावीन्यपूर्ण योजनेची सुरूवात केली आहे. १ मे अर्थात महाराष्ट्र दिन पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपूर्ण १ हजार ५७४ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत असून यामध्ये १३ तालुके, ३३ पोलीस स्टेशन आणि १ हजार ५७४ गावे आणि बर्याच वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे. पोलीस ठाण्यांतून निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार नियुक्त केले गेले आहेत
योजनेचा मुख्य उद्देश संबंधित गावातील माहिती संकलन, जलद प्रतिसाद, तसेच नागरिकांशी थेट संवाद प्रस्थापित करणे हा आहे. महिला सुरक्षेसाठी तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती यावर योजनेचा विशेष भर राहणार आहे. योजनेचा उद्देश समुदाय पोलिसिंग अधिक सक्रियपणे राबविणे आणि गावपातळीवरच संभाव्य गुन्ह्यांचे प्रतिबंध करणे असा आहे.
हेही वाचा – ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
पोलिसांचा जनतेशी संवाद वाढावा, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि गावकरी देखील पोलीस यंत्रणेचा भाग बनावेत, अशी कल्पना या योजनेतून प्रत्यक्षात आणली जात आहे.
‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ हे मोबाईल अॅपदेखील तयार करण्यात आले आहे. ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या अॅपद्वारे पोलीस पाटील व अंमलदार थेट संवाद साधू शकतील, सूचना नोंदवू शकतील आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देऊ शकतील.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यामध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडणे. तसेच, पोलीस व जनतेमध्ये विश्वास निर्माण करून, सामुदायिक पोलिसिंगला चालना देणे, महिला व बालकांच्या संबंधित गुन्ह्यामध्ये तातडीने कारवाई करणे आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
– पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण