PCMC: वायसीएम रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!
भाजपा नगरसेविका योगिता नागरगोजे यांचे आयुक्तांना निवेदन

– डिजिटल पेमेंट, वाय-फाय, चार्जिंग व झेरॉक्स सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी
पिंपरी- चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सौ. योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वायसीएम रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्हा आणि राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. शहरातील प्रमुख महापालिका रुग्णालय म्हणून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरगोजे यांनी निवेदनात म्हटले आहे.
रुग्णालय परिसरात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधणे कठीण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधता न आल्याने मानसिक तणाव वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सर्व मोबाईल सेवा प्रदात्यांचे नेटवर्क सुरळीत उपलब्ध करून देण्याबरोबरच हाय-स्पीड वाय-फाय सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
डिजिटल पेमेंट सुविधेची मागणी
रुग्णालयातील कॅश काउंटरवर केवळ रोख व्यवहार स्वीकारले जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व कॅश काउंटरवर यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि QR कोडद्वारे डिजिटल पेमेंट सुविधा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
२४ तास झेरॉक्स व मोबाईल चार्जिंग सुविधा आवश्यक
उपचार प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर जावे लागते. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे रुग्णालय परिसरात २४ तास झेरॉक्स सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दीर्घकाळ रुग्णालयात थांबणाऱ्या नातेवाईकांसाठी सुरक्षित मोबाईल चार्जिंग पॉईंट्स उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मोशीतील ८५० बेडचे रुग्णालय लवकर पूर्ण करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे ८५० बेड क्षमतेच्या अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी महापालिका रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे नागरगोजे यांनी म्हटले आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे रुग्णालय लवकर कार्यान्वित झाल्यास शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देऊन नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी केली आहे.





