अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

थोडे वाचावे पण कृतीत आणावे.

खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो, आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते, आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचे असेच आहे; म्हणून, थोडेच वाचून, समजून घ्यावे, आणि ते कृतीत आणावे. नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो, आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस-तीस मिनिटे पुरेशी होतात; पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल, आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये. थोडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून, ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा, ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते नि:स्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदान्ताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही; त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वत:ला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !

हेही वाचा –  ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद’; मुख्यमंत्री फडणवीस

वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की, वस्तूच्या सहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळविण्याच्या मागे लागतो, आणि शेवटी दु:खी बनतो. कर्माला सुरुवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दु:ख होते; कर्म करीत असताना, फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दु:ख होते; कर्म संपून, फळ मिळाले नाही तर दु:ख होते; आणि फळ मिळालेच, तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन, फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दु:ख होते. सारांश, अथपासून इतिपर्यंत दु:खच पदरात पडते. यासाठी, फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे.

बोधवचन:- अधिक वाचू नका, जे काही थोडे वाचाल, त्याचे मनन करा, आणि ते कृतीत आणा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button