‘तुमची एक गोळी,तर आमचा तोफगोळा !
'ट्रम्प फॅक्टर' झिडकारला ; पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिवसभर उच्चस्तरीय बैठकांचा धडाका !

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धविराम घोषित झाला असला, तरी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सुरूच राहणार आहे, असा स्पष्ट खुलासा तिन्ही दलाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी युद्धविराम जाहीर केला असला तरी तो स्वल्पविराम आहे, अशी प्रतिक्रिया संरक्षण विषयकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दिवसभर सर्व दलांच्या प्रमुखांचा तसेच संरक्षण विषयक पदाधिकाऱ्यांचा बैठकांचा धडाका सुरूच होता. ‘तुमची एक गोळी आली, तर आमच्याकडून तोफगोळे सोडले जातील’, असा थेट इशारा मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
भारत-पाक कराराकडे लक्ष..
युद्धविरामाच्या वेळी जाहीर केल्याप्रमाणे दि. १२ रोजी दुपारी बारा वाजता दोन्ही देशांदरम्यान होणारी बैठक आणि करार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आता गप्प असला, तरी यानंतर मात्र अधिक आक्रमक होण्याची शक्यता देखील आहे. या करारामध्ये, सिंधू आणि झेलम, चिनाब आणि रावी या नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न तसेच पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानचा प्रश्नही चर्चिला जाण्याची शक्यता आहे.
गोळ्यांचे उत्तर तोफगोळ्याने : मोदी
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या गेल्या, तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबणार नसून ते सुरुच असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नव्हे, तर भारताने स्वतःच्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद’; मुख्यमंत्री फडणवीस
पाकड्यांना न भरून येणाऱ्या जखमा !
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला अशा जखमा केल्या आहेत, ज्या भरून येण्यास बरीच वर्षे जावी लागतील. गेल्या चार दिवसात भारतीय सैन्याने १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना नरकात पाठवले आणि नऊ दहशतवादी अड्डे आणि पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. थोडक्यात, त्यांची बलस्थानेच उद्ध्वस्त केली आहेत !
स्वतःच्या अटींवर भारताचा युद्धविराम !
भारताने स्वतःच्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली असून पाकिस्तानने युद्धबंदी आणि अमेरिकेशी चर्चेची विनंती केल्यानंतर, भारताने स्वतःच्या अटींवर युद्धविरामची घोषणा केली. त्यापूर्वी, दि. ९ मेच्या रात्री, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी नरेंद्र मोदींशी संवाद साधला होता.
पाकिस्तानचे आठ एअरबेस लक्ष्य
भारताची भूमिका स्पष्ट होती, की जर पाकिस्तानने काहीही आगळीक केली, तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. या संभाषणानंतर, दि. १० मेच्या रात्री, पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या आठ एअरबेसना लक्ष्य केले.
भारताची भूमिका पारदर्शक आणि स्पष्ट..
पाकिस्तानसोबत युद्धविराम झाल्यानंतर भारत सरकारने स्पष्ट केले, की पाकिस्तानसोबत राजकीयदृष्ट्या, परराष्ट्र व्यवहारमंत्री किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर कोणतीही चर्चा होणार नाही. पाकिस्तानशी चर्चा फक्त ‘डीजीएमओ’ पातळीवरच होईल. हा स्पष्ट संदेश भारताने जगाला दिला आहे. याचा अर्थ असा, की मध्यस्थीसारख्या कोणत्याही गोष्टीला यापुढे वाव राहणार नाही. त्याच वेळी, भारतीय लष्कराने आपल्या दलांना कोणत्याही प्रक्षोभक प्रयत्नांना योग्य उत्तर देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना स्पष्ट संदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मोदी म्हणाले होते की आम्ही दहशतवाद्यांचा नाश करू. मोदींचा स्पष्ट संदेश होता, की जर सीमेपलीकडून गोळी झाडली गेली, तर आमच्याकडून गोळी झाडली जाईल. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत, बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, आणि भारताची आक्रमक भूमिका जगाने पाहिली. भारताने कोणत्याही नागरी वस्त्यांवर हल्ले केलेले नाहीत. याउलट, पाकिस्तानचे लक्ष शाळा, रुग्णालये आणि नागरी वस्त्या हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीर परत घेणे, हा एकमेव मुद्दा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय अनेक बैठका झाल्या. परिस्थिती निवळलेली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारत सरकार लष्करी भूमिकेवर अजूनही ठाम आहे. एवढेच नाही तर भारताने काश्मीरबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. आता फक्त एकच मुद्दा उरला आहे, तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर परत घेणे, याचा पुनरुच्चार या बैठकांमध्ये झाला. पाकिस्तानची खुमखुमी थांबलेली नाही, त्यामुळे लष्कराने आपल्याला देण्यात आलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा आणि त्यांना धडा शिकवावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. भारताची यापुढे चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर परत घेणे आणि दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देणे या मुद्द्यावरच होईल असे भारताने स्पष्ट केले आहे.