सुरक्षा यंत्रणा म्हणजे ‘‘हजेरी लावा अन् पगार घ्या’’!
साईनाथनगर–यमुनानगर येथील उद्यानांची सुरक्षा वाऱ्यावर
भाजपा नगरसेविका अर्चना करांडे यांची तातडीच्या कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर २२ परिसरात वाढत्या गुन्हेगारी, नशेखोरी आणि अवैध प्रकारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना आता निगडीतील साईनाथनगर आणि यमुनानगर परिसरातही भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास येथेही गुन्हेगारी, दहशतगिरी आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही मोकळ्या जागा, उद्याने आणि अंधारे भाग येथे रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढताना दिसत आहेत. काही ठिकाणी तरुणांचे टोळके बसत असल्याने महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः उद्यान परिसरात मद्यपी आणि अवैध प्रकार करणाऱ्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषत: छत्रपती संभाजी महाराज उद्यान, महाराणा प्रताप उद्यान येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेह वाचा : PCMC: वायसीएम रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!
महापालिका प्रशासनाकडून उद्यान आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक ड्युटीवर उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही गार्ड केवळ हजेरी लावून निघून जात असल्याने सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही सुरक्षा व्यवस्था प्रभावी नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासनाला इशारा…
नसरापूर येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करत नागरिकांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की, “दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा ती आधीच रोखणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यामुळे परिसरात नियमित पोलीस गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षकांची उपस्थिती आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अक्षय कारंडे यांनीही प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सुरक्षारक्षकांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.
साईनाथनगर आणि यमुनानगर परिसरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही तर येथेही गुन्हेगारी, दहशतगिरी आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढू शकतो. महापालिकेकडून सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असतानाही अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक ड्युटीवर दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, पोलीस गस्त वाढवावी आणि अवैध प्रकारांवर नियंत्रण आणावे.
– अर्चना करांडे, नगरसेविका, भाजपा.





